दावडी : ‘आमचे हातावरचे पोट आहे रे बाबा.. हजार-पाचशेच्या नोटा सरकारने बंद करून टाकल्या.. शंभर-पन्नासच्या नोटा द्या, तरच कामावर येईन.. हजार-पाचशेच्या नोटा चालत नाहीत. त्याचा किराणाबी येत नाही. आमचं बँकेत खांत नाही.. आम्हा आडाणी माणसांना नोटा बदलण्यासाठी गर्दीत तासन् तास उभं राहायला जमत नाहीच.. चालणाऱ्या नोटा देत असाल तरच शेतकामांना येतो’... असे शेतकाम मजूर म्हणू लागल्याने शेतकामांना विलंब होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.खेड तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा-बटाटा लागवड सुरू आहे. तसेच, काही ठिकाणी ऊसलागवड व तरकारी पिकांची काढणी व पिके खुरपणीची लगबग सुरू आहे. या शेतकामांना मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. सरकारने गेल्या आठवड्यात एक हजाराची व पाचशे रुपायांची नोट चलनातून बंद होणार आहेत, अशी घोषणा केली. शंभर व पन्नास रुपयांची नोट देत असला, तर तुमच्याकडे कामाला येतो. नाही तर दुसरीकडे जातो, असे मजूर शेतमालकाला ठणकावून सांगत आहे. शेतमालकांकडेही शंभर-पन्नास रुपयांचा तुटवडा असल्याने मजूर येत नाहीत. शेतकामांना यांचा फटका बसून कामे लांबणीवर पडत असल्याचे कोरेगाव (ता. खेड) येथील शेतकरी गणेश डावरे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
चालणाऱ्या नोटा देत असाल, तरच कामाला येतो
By admin | Published: November 15, 2016 3:37 AM