उरल्या फक्त आठवणी; कोरोनाने १५ दिवसांत सगळं कुटुंबच हिरावून नेलं!
By प्राची कुलकर्णी | Published: April 16, 2021 10:15 PM2021-04-16T22:15:14+5:302021-04-16T22:16:48+5:30
15 दिवसांत बेड मिळवण्यापासून ते औषधांसाठीही धावपळ करून हाती काहीच नाही राहीलं
“अगदी एक महिन्यापूर्वी अख्खं कुटुंब एकत्र होते. एकत्र भेटले, जेवले.. पण आज मात्र राहिल्या आहेत ते त्यांच्या आठवणी” ... अरुण गायकवाड सांगत होते.. त्यांनी जवळपास पंधरा दिवस केलेली धडपड त्यांच्या डोळ्यांसमोरुन जात होती.. आणि बोलण्यातुनच त्यांची असाहय्यता समोर दिसत होती. ही धडपड होती त्यांच्या कुटुंबाला वाचवण्याची.
ही कहाणी आहे पुण्यातल्या जाधव कुटुंबाची.. काही दिवसांपूर्वी अगदी हसतं खेळतं असणारं हे कुटुंब आज होतं असं म्हणायची वेळ आली आहे.. कारण या कुटुंबातले ४ जण पंधरा दिवसांमध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. अर्थातच कोरोनानी. अरुण यांची पत्नी वैशाली गायकवाड, वैशाली यांचे दोन्ही भाऊ आणि आई चौघंही पंधरा दिवसांच्या फरकाने मृत्यूमुखी पडले आहेत.
वैशाली यांचे वडिल १५ जानेवारीला गेले. त्यानंतर दोन महिन्यांनी पुजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं. आणि त्यानंतरच कुटुंबातील एकानंतर एक जण पॅाझिटिव्ह यायला सुरुवात झाली. पहिल्यांदा पॅाझिटिव्ह आला तो धाकटा भाऊ ३८ वर्षांचा रोहीत जाधव. त्या पाठोपाठ एक एक करत इतर सगळेच पॅाझिटिव्ह आले. शहरातील परिस्थिती अगदी बिकट असताना पॅाझिटिव्ह झालेल्या या सगळ्यांना ॲडमिट करायची वेळ आली तेव्हा मात्र प्रचंड धावपळ करावी लागणे साहजिकच होते.
रोहीत जाधवांना बाणेर कोव्हीड सेंटरला ॲडमिट केलं. दुसरा भाऊ चाळीस वर्षांचा अतुल कोथरुडच्या देवयानी रुग्णालयात. वैशालींची आई अलका जाधव विश्रातवाडीच्या रुग्णालयात दाखल होत्या. २८ तारखेला वैशाली यांना त्रास व्हायला लागला तेव्हा तर अतुल यांना आणखी प्रचंड धावपळ करावी लागली.
“ वैशालीची ॲाक्सिजन पातळी कमी होती. त्यामुळे मी तिला घेवुन आधी भारती हॅास्पिटलला गेलो. तिकडे बेड मिळाला नाही म्हणून रुबीला गेलो. शेवटी ॲम्ब्युलन्स मधली ॲाक्सिजन संपत आला. तेव्हा ड्रायव्हरने मदत केली आणि आम्ही तिला खेड शिवापुरच्या श्लोक रुग्णालयात दाखल केले. तिथे एक दिवस ठेवलं. प्रकृती सुधारतेय असं वाटतानाच दुर्दैवाने ३० मार्चला ती गेली” अरुण गायकवाड सांगत होते.
दरम्यान गायकवाड यांच्या आई आणि मुलांनाही कोरोनाची लागण झाली होती. घरातले सगळेच पॅाझिटिव्ह असताना धावपळ करणारे ते एकटेच उरले होते. “ एकीकडे गेलेल्यांचे अत्यंसंस्कार दुसरीकडे उरलेल्यांसाठी औषध मिळवणे अशी दुहेरी कसरत सुरु होती. मेव्हण्यासाठी रेमडेसिविर मिळवायला तर तीन दिवस प्रचंड फिरलो. ब्लॅकने औषधं मिळवली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही” ३
3 एप्रिलला रोहित शंकर जाधव वय ३८ वर्षे गेले. ४ एप्रिल ला त्यांचा आई अलका शंकर जाधव वय ६२ वर्ष यांचे निधन झाले. तर १४ एप्रिलला ४० वर्षांच्या अतुल शंकर जाधव यांचाही मृत्यू झाला. आता मागे उरले आहेत ती रोहीत आणि अतुल यांच्या पत्नी आणि मुलं. आणि वैशाली गायकवाडांचे कुटुंबीय. घरातले सगळे गेले, आधार नाही अशात आता पुढे काय असा प्रश्न आज त्या संपुर्ण कुटुंबासमोर आहे. जाधवांचे संपुर्ण कुटुंब कोरोनाने केवळ ४५ दिवसात उध्वस्त केलंय.