श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला?
By श्रीकिशन काळे | Published: May 23, 2023 04:50 PM2023-05-23T16:50:16+5:302023-05-23T16:50:42+5:30
तुरळक लोकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेतल्या, त्यामुळे नोटाबंदीच्या वेळी झालेला गोंधळ आज दिसला नाही
पुणे : दोन हजार रूपयांची नोट आजपासून (दि.२३) बँकेमध्ये बदलून देण्यास सुरवात झाली. परंतु, सामान्य लोकांकडे या नोटा नसल्यामुळे बँकांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले नाही. एवढ्या दोन हजारांची नोट आता कुठे ठेवणार ? पैसेच नाहीत. श्रीमंत लोकांकडेच या नोटा सापडतील...pun! अशा प्रतिक्रिया बँकांमधील ग्राहकांकडून आल्या.
रिइर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रूपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २३ मे पासून या नोटा बँकांमधून बदलून मिळतील, अशी घोषणाही केली. त्यामुळे आज बँकांमध्ये प्रचंड गर्दी होईल, अशी आशा सर्वांना होती. परंतु, दोन हजारांच्या नोटा सर्वसामान्य लोकांकडे नसल्याने बँकांमध्ये गर्दी पहायला मिळाली नाही. तुरळक लोकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेतल्या. त्यामुळे नोटाबंदीच्या वेळी झालेला गोंधळ आज दिसला नाही.
दुसरीकडे अनेक ग्राहक दोन हजारच्या नोटा पतसंस्थांमध्ये बदलण्यासाठी घेऊन गेले. पण तिथे त्यांना बदलून दिले जात नव्हते. तसेच काहींनी वीज बिल भरण्यासाठी दोन हजाराची नोट पतसंस्थेत दिली तरी ती स्वीकारली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळाली. तसेच काही पेट्रोल पंपांवरही दोन हजारांच्या नोटा घेतल्या नाहीत. कारण त्यांना बदलून देण्यासाठी सुट्टे पैसे पंप कर्मचाऱ्यांकडे नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी तर दोन हजारची नोट घेणार नसल्याचे फलकही लावले होते.