पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पुण्यात जर काेणी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असेल तर त्यावर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पाेलिसांनी जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारी कार्यालये आणि काही महाविद्यालयांच्या बाहेर उभे राहून हेल्मेट घालून न येणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली हाेती. एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात घडलेल्या प्राणांतिक अपघातांची संख्या अधिक असल्याने तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट परीधान केले नसल्याचे समाेर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पाेलिसांकडून एक जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार आहे. यावर आता विविध राजकीय पक्षांकडून विराेध हाेत आहे. या आधी अनेकदा शहरात हेल्मेट सक्तीचा प्रयाेग करण्यात आला हाेता. परंतु प्रत्येकवेळी नागरिकांनी याला कडाडून विराेध केल्याने सक्ती मागे घ्यावी लागली हाेती. आता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.
लाेकमतने पुण्यातील विविध हेल्मेट दुकानांचा आढावा घेतला असता, नागरिकांकडून हेल्मेट खरेदीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णय झाला असला तरी हेल्मेट खरेदीत फारशी वाढ झालेली नाही. काही नागरिक सुरुक्षेसाठी हेल्मेट घेण्याकडे सध्या वळत असल्याचे चित्र आहे. हेल्मेट विक्रेते जगदीश शिंदे म्हणाले, येत्या एक तारखेपासून शहरात हेल्मेट सक्तीची घाेषणा करण्यात आली असली तरी नागरिक हेल्मेट सक्ती फारशी गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. हा निर्णय जाहीर केला असला तरी नागरिकांकडून हेल्मेट खरेदीत फारसा फरक पडला नाही. जे एक दाेन टक्के प्रमाण वाढले असेल ते डाेक्याचे संरक्षण म्हणून आणि प्रदूषणापासून बचाव व्हावा यासाठी नागरिक हेल्मेट खरेदी करत आहेत. त्यातही महिलांचा हेल्मेट खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. साधारण आठशे ते चार ते पाच हजारांपर्यंत हेल्मेट विक्रीस उपलब्ध आहेत.
रामदास भगत म्हणाले, हेल्मेट सक्ती जाहीर केली असली तरी नागरिकांमध्ये त्याचे फारसे गांभिर्य नाही. या आधी अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली हाेती. परंतु दरवेळेस ती मागे घेण्यात आली. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी लाेक हेल्मेट वापरत नाहीत. ज्यांना हायवेने प्रवास करायचा आहे किंवा ज्यांना दरराेज 15 ते 20 किलाेमीटरचे अंतर पार करावे लागते असे नागरिक हेल्मेट वापरतात. एक तारखेपासून जरी हेल्मेट सक्ती हाेणार असली तरी दरवेळेस प्रमाणे यंदाही ती मागे घेण्यात येईल या आशेने नागरिकांचा हेल्मेट खरेदीला फारसा प्रतिसाद नाही.