कुटुंब नियोजनाचा भार स्त्रियांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:48 PM2018-05-08T17:48:10+5:302018-05-08T20:25:57+5:30
शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज तसेच पुरुषी मानसिकतेमुळे महिलांनाच या शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जात आहे.
निनाद देशमुख
पुणे : समाजातील पुरुषी मानसिकता अद्यापही बदलली नसल्याचे शासनाच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलांनाच पुढाकार घ्यावा लागत असून, पुरुषांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाचा भार आजही महिलांनाच उचलावा लागत असल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे.
कुटुंब नियोजनासाठी शासनातर्फे कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. यासाठी शासनस्तरावर विविध योजनाही आहेत. मात्र, या शस्त्रक्रियेबाबत आजही पुरुषांमध्ये उदासीनता दिसून येते. शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज तसेच पुरुषी मानसिकतेमुळे महिलांनाच या शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जात आहे. शासकीय स्तरावर प्रयत्न होऊनही शस्त्रक्रिया करण्यास पुढे येत नसल्याने स्त्रियांच्या तुलनेत पुरुष शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्टही कमी ठेवण्यात आले आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी शासनातर्फे उद्दिष्ट ठेवण्यात येते.गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्रक्रिया या महिलांनी केल्याची माहिती पुढे आहे. त्या संख्येपुढे पुरुष शस्त्रक्रियांची संख्या ही नगण्य आहे. २०१३-१४ या वर्षात २८ हजार १५० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जवळपास हे उद्दिष्ट पूर्ण झाले असून यात २७ हजार २४३ महिलांनी शस्त्रक्रिया केल्या त्या तुलनेत या वर्षी केवळ २०४ पुरुषांनी शस्त्रक्रिया झाल्या. २०१४-१५ मध्ये २८ हजार ४०१ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी २३ हजार ८८९ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर यावर्षी केवळ ५८ पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१५-१६ मध्ये २८ हजार ४०१ च्या उद्दिष्टापैकी २३८८६ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. यापैकी २३७२१ महिलांच्या व १६५ पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१६-१७ मध्ये २६ हजार ४०६ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी केवळ ३३१ शस्त्रक्रिया पुरुषांच्या, तर २२ हजार ६११ शस्त्रक्रिया या महिलांच्या करण्यात आल्या. २०१७-१८ मध्ये २१ हजार ५७२ उद्दिष्टांपैकी केवळ ८२ पुरुषांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या, तर १९ हजार ११८ महिलांनी या शस्त्रक्रिया केल्या. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांबाबत अनेक गैरसमजुतीमुळे आजही ही शस्त्रक्रिया टाळली जाते. आत सुशिक्षितांचे प्रमाणही मोठे आहे. याबाबत जनजागृती होत असली तरी पुरुषांकडून आजही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
भ्रामक समजुती
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत अनेक सुशिक्षितांमध्येही भ्रामक समजुती आहेत. ही शस्त्रक्रिया केल्यास पुरुषार्थावर परिणाम होतो, असा समज आजही अनेकांचा आहे. कमी प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने पुरुष शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट कमी करण्याची वेळ आली आहे.
अ.क्र. वर्ष उद्दिष्ट पुरुष स्त्री एकूण टक्केवारी
शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया
१ २०१३-१४ २८१५० २०४ २७२४३ २७४४७ ९८
२ २०१४-१५ २८४०१ ५८ २३८८९ २३९४७ ८४
३ २०१५-१६ २८४०१ १६५ २३७२१ २३८८६ ८४
४ २०१६-१७ २६४०६ ३३१ २२६११ २२९४२ ८७
५ २०१७-१८ २१५७२ ८२ १९११८ १९२०० ८९