फाटक उघडेच अन् रेल्वे गाडी आली, सुदैवानं जीवितहानी टळली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 01:51 AM2019-01-20T01:51:02+5:302019-01-20T01:51:09+5:30
पुणे स्थानकावरून दौंडकडे जाणाऱ्या रेल्वे रूळाने नेहमीप्रमाणे गाडी घेऊन जात असताना रेल्वे चालकाला दुरूनच पुढील फाटक बंद नसल्याचे लक्षात आले.
मांजरी : पुणे स्थानकावरून दौंडकडे जाणाऱ्या रेल्वे रूळाने नेहमीप्रमाणे गाडी घेऊन जात असताना रेल्वे चालकाला दुरूनच पुढील फाटक बंद नसल्याचे लक्षात आले. फाटक सुरू असल्याने फाटकातून रस्ते वाहतूकही सुरू होती आणि इकडे रुळावरून रेल्वे येत होती. कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकणार होते. सुदैवाने रेल्वे गाडीचा वेग कमी होता.
चालकाने जोरात गाडीचा हॉर्न वाजविला आणि आकस्मिक ब्रेक दाबला. शेवटी फाटकाच्या आधीच काही अंतरावर ही गाडी थांबली आणि पुढील अनर्थ टळला. मांजरी बुद्रुक रेल्वेगेट क्रमांक तीनवर हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे ते दहा वाजून छप्पन मिनिटांच्या दरम्यान घडला. रेल्वेचालकाने दाखविलेल्या प्रसांगवधानाने मोठा अनर्थ टळला. रेल्वेगेट बंद होण्याचा सायरन वाजत असतानाही फाटकाच्या दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करत होती. त्यातच नेमक्या रुळावर वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे रेल्वेगेट बंद होत नव्हते आणि गेट बंद होत नसल्याने सिग्नल मिळत नाही, असे लक्षात आल्याने तसेच गेट उघडे असून वाहतूकही सुरू असल्याचे रेल्वे चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने फाटकापासून काही मीटर अंतरावर पुणे-दौंड-पंढरपूर ही रेल्वे गाडी थांबविण्यात आली. त्यानंतर रुळावरील वाहतूक पुढे मागे करून गेट बंद करण्यात आले. त्यानंतर रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. यात सुमारे १६ ते २० मिनिटे रेल्वेचा खोळंबा झाला. तर वारंवार अशी घटना पाहणाºया नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
>...अशी घटना वारंवार घडते
मांजरी बुद्रुक रेल्वे गेट क्रमांक तीनवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच गेट बंद होण्याचा सायरन वाजत असताना रिक्षा व टेम्पो चालकांची तसेच अवजड वाहनांची गेट पास करण्याची स्पर्धा सुरू असते.
त्यामुळे नेमकी रेल्वे रुळावर वाहतूककोंडी होऊन गेट बंद करण्यास अडथळा निर्माण होतो. त्यातच रेल्वे येत असते, अशी घटना येथे वारंवार घडत आहेत.