शहरातील माेकळ्या खाणी ठरतायेत धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:51 PM2018-04-19T16:51:16+5:302018-04-19T16:51:16+5:30
पुण्यातल्या विविध भागात माेकळ्या खाणी असून या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. खाेलीचा अंदाज न अाल्याने या खाणींमध्ये बुडून काहींचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूला संरक्षक भिंती उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुणे : शहरात विविध ठिकाणी असललेल्या माेकळ्या खाणींमध्ये पाेहायला तरुण मंडळी जात असतात. या खाणी बऱ्याच खाेल असून अाकाराने माेठ्या अाहेत. अनेकदा या खाणींमध्ये पाेहताना खाेलीचा अंदाज न अाल्याने तसेच पाेहताना धाप लागल्याने तरुणांचा मृत्यू झाल्याचे समाेर अाले अाहे. काही दिवसांपूर्वीच कलवड भागातील एका खाणीमध्ये पाेहताना एका तरुणाचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे या माेकळ्या खाणी धाेकादायक ठरत असून त्यांच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्याची मागणी अाता करण्यात येत अाहे.
पुण्यातील लाेहगाव, विश्रांतवाडी तसेच वारजे भागात पाण्याच्या खाणी अाहेत. फार पूर्वी या खाणी दगड मिळविण्यासाठी खाेदण्यात अाल्या हाेत्या. कालांतराणे या खाणींमध्ये पावसाचे पाणी तसेच भूजलाचे पाणी साठून एकप्रकारे तळे तयार झाले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. अनेकदा खाेलीचा अंदाज न अाल्याने तसेच पाेहताना धाप लागल्याने काहींचा मृत्यूही या ठिकाणी झाला अाहे. तसेच लाेहगाव व विश्रांतवाडी येथील या माेकळ्या खाणींमध्ये अनेकांनी अात्महत्या सुद्धा केल्या अाहेत. या खाणींच्या जवळ लाेकवस्ती असल्याने नागरिकांच्या खासकरुन लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. कलवड येथील एका खाणीच्या मुख्य रस्त्याच्या बाजूने भिंत बांधली असली तरी लाेकवस्तीकडून खाणीकडे जाणाऱ्या भागात कुठलेही कुंपन नसल्याने काेणीही सहज या खाणींजवळ जाऊ शकते. त्याचबराेबर रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असल्याने नागरिकांच्या जीवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे.
काही ठिकाणी या खाणींचा वापर हा कचरा टाकण्यासाठी करण्यात येत असल्याचे ही दिसून येत अाहे. त्यामुळे या खाणींमध्ये कचऱ्याची बेटे तयार झाली असून जवळील नागरिकांचे अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. पालिकेकडून विश्रांतवाडी येथील खाणीमध्ये वाॅटर स्पाेर्टस करण्याचा प्रस्ताव अाणला हाेता. मात्र त्याला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी नागरिक अाता करीत अाहेत.