लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत व्यवसाय, हॉटेल, मॉल आणि विविध आस्थापनांना सवलत दिली आहे. याच धर्तीवर धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे विभागीय धर्मादाय कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे या वकील संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे करण्यात आली आहे.
सध्या अनेकांचे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. यामुळे तर काहींनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपविले आहे. अशा परिस्थितीत श्रध्दाळू लोकांना मंदिरातून दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळत असते. मात्र, मंदिर बंद आहेत. त्यामुळे मंदिरे सुरू करण्याबाबतचा विचार करायला हवा. मद्यविक्री सुरू असताना मंदिरेच का बंद, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मोठी देवस्थाने उघडल्यास गर्दी होईल, असे अशी भीती वाटत असेल, तर ऑनलाईन वेळ ठरवून भाविकांना प्रवेश द्यावा. जेथे गर्दी होणार नाही, ती देवस्थाने पूर्णपणे खुली करावीत, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागीरदार, उपाध्यक्ष ॲड. मोहन फडणीस, सचिव ॲड. सुनील मोरे आणि खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांनी केली आहे.
---------------------------------------------------------------
कोविडमुळे नैराश्याच्या गर्तेतून मानसिक संतुलन बिघडलेली अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. सकारात्मक ऊर्जा देणारी धार्मिक स्थळे बंद ठेवून शासनास नक्की काय साधावयाचे आहे ते समजत नाही. चैतन्याचा मूळ स्रोत असलेली धर्मस्थाने योग्य त्या निर्देशांसह त्वरित उघडण्यात यावीत.
- ॲड. शिवराज प्र. कदम जहागीरदार, अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
--------------------