सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरल फेलोशिपची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:23 AM2018-08-19T00:23:22+5:302018-08-19T00:23:49+5:30
पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपलब्ध होणार आहे.
पुणे : पीएचडी मिळवल्यानंतर पुढेही संशोधन करावयाचे असल्यास पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपची संधी सावित्रीबाई फुलेपुणेविद्यापीठात उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन प्र-कुलुगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्रातील विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव्यविद्या, भाषा इत्यादी विद्याशाखांमधील पीएच.डी. धारकांना पुढील संशोधनाची संधी विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रा. डॉ. (कॅप्टन) सी. एम. चितळे, प्रा. डॉ. डी. एस. जोग, प्रा. डॉ. एस. आर. गद्रे, प्रा. डॉ. मनोहर जाधव, डॉ. रोहित काळे, सुबोध खिरे, सुनील होडे उपस्थित होते. पोस्ट डॉक्टरल फेलोशिपबाबतची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर दिली.
पीएच.डी.नंतर संशोधन क्षेत्रात सखोल काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ अध्यापन क्षेत्राकडे वळू शकेल. परिणामी संशोधन व अध्यापन क्षेत्रात पुढे जाऊन भरीव काम होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप (एसपीपीयू - पीडीएफ) प्रोग्राम या अभ्यासक्रमासाठी पात्र धरण्यात येईल. अर्ज आॅनलाइन माध्यमातून भरल्यावर अर्जदारांनी अर्जाची प्रत प्रिंट करून विद्यापीठात संबंधित विभागाच्या कार्यालयात भरणे आवश्यक आहे.