लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील १३ पैकी १० गटांचे आरक्षण महिलांसाठी आरक्षित असल्याने आपल्या प्रभागांतील महिला भगिनींची मते आपल्याला किंवा आपल्या यजमानांनाच मिळावीत, म्हणून इच्छुक उमेदवार महिलांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी-कुंकू समारंभ आयोजिण्यावर भर दिला आहे. याद्वारे जास्तीत जास्त मतांचे दान आपल्यालाच कसे मिळेल, यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.काही उमेदवारांनी जेजुरीच्या खंडोबाच्या जागरण गोंधळाच्या नावाखाली सामिष मांसाहारी जेवणाच्या पंगती घालण्यास सुरुवात केली, तर काही उमेदवारांनी शेतीच्या बांधावरील म्हसोबाला नवीन शेंदूर थापून रानजत्रा करण्याचा धडाका लावला आहे. रविवारी (दि. १५) मकर संक्रांत झाली. परंतु या सणाचे कवित्व मात्र अद्यापही चालू आहे. महिलांना मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभाला निमंत्रित करायचे. एखादी जास्त महाग नसलेली छोटीशी भेटवस्तू द्यायची व हळूच आपला प्रचार करायचा, असे प्रचाराचे नियोजन इच्छुक महिला उमेदवार अथवा त्यांच्या यजमानांनी मिळून चालू केला आहे. भेटवस्तू छोटी असल्याने खर्च जास्त करावा लागत नाही. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही विवाहित महिलेला हळदी-कुंकू समारंभाचे निमंत्रण म्हणजे मोठा मान मिळाला, असे समजले जाते. त्यामुळे शक्यतो हळदी-कुंकू समारंभाचे आमंत्रण कुठलीही महिला नाकारत किंवा टाळत नाही. (वार्ताहर)
हळदी-कुंकू समारंभातून महिला इच्छुक मागताहेत मतांचे दान
By admin | Published: January 24, 2017 1:41 AM