आम्ही विनातिकीट प्रवास केला; आमच्याकडूनही तिकिटाचे पैसे वसूल करुन घ्या- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 01:36 PM2022-03-06T13:36:04+5:302022-03-06T13:36:11+5:30
नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं.
पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. मोदी तब्बल पाच तास आज पुण्यात असणार आहेत. यादरम्यान पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रोचे उदघाटन, पीएमपीएलच्या 100 ई-बस आणि ई-बस डेपोचं लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं.
नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. यानंतर मोदींनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास केला. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला.
पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पुण्याची आपली मेट्रो धावली आहे. या मेट्रोचं पहिलं तिकीट खुद्द पंतप्रधानांनी मोबाईलवर पेमेंट करून काढलं आहे. त्यामुळे आता मी मेट्रोवाल्यांना सांगणार आहे की, आम्ही विना तिकीट प्रवास केला आहे, तेव्हा आमच्याकडून देखील तिकिटाचे पैसे वसूल करुन घ्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पुण्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण https://t.co/OSltX540Bo
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 6, 2022
मोदींनी दिव्यांगांशी साधला संवाद
या मेट्रोच्या प्रवासात पंतप्रधान मोदींनी काही दिव्यांग शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.