लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी परवानगी दिलेल्या पालख्या या बसनेच नेण्यात येणार आहेत. राज्य शासनाने याबाबत आदेश सोमवारी (दि. १४) जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार गतवर्षीप्रमाणेच वारीचे स्वरूप असणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात वाखरी ते पंढरपूर दरम्यानचे दीड किलोमीटर अंतरच पायी वारी होणार आहे.
यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वारकरी, देवस्थान आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. शासनाने वारीसाठी काढलेल्या सुधारित नियमावलीनुसार मानाच्या दहा पालख्यांनाच या वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी यावर्षी देहू आणि आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालखी किंवा दिंड्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याव्दारे आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
चौकट
वारीसाठी विशेष २० बस
मानाच्या दहा पालख्यांना वारीला जाण्यासाठी २० बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटींवरच परवानगी देण्यात आली आहे.