पुणे : अवयव निकामी झाल्यानंतर तो न मिळाल्याने देशात अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे अवयव दान ही चळवळ वाढविणे आवश्यक आहे. यंदा पुण्यात सहा महिन्यांत ७१ मृतमेंदू रूग्णांची नोंद झाली. त्यापैकी ५० मेंदुमृतांच्या नातेवाईकांनी रूग्णाचे अवयव दान करण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी ४२ जणांचे अवयव प्रत्यारोपित करण्यात आले. मागणीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे अवयव दानाची अधिकाधिक जागृती होणे गरजेचे आहे. अवयवदान हे श्रेष्ठदान आहे. ही एक काळाची गरज बनली असून, यातून कुणालातरी जीवदान मिळू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्यांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती झाली असली तरी लोक अवयदानाबाबत तयारी दर्शविण्याची वेळ येते तेव्हा पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती समोर आली आहे. आजमितीला पुण्यात सर्वात जास्त मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणासाठी जवळपास 1200 रूग्ण प्रतिक्षेत आहेत. तर अन्य अवयवांमध्ये यकृत ची प्रतीक्षा संख्या अधिक आहे. 13 ऑगस्ट हा अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. पुण्यात 1988 मध्ये पहिले अवयवदान झाले. त्यानंतर 25 वर्षांनी नोव्हेंबर 2013 मध्ये अवयवदान झाले. हदयप्रत्यारोपणासाठी 2017 साल उजाडावे लागले. इतक्या वर्षात अजूनही अवयवदानाबाबत फारसे चित्र बदलले नाही. शासन, सामाजिक संस्थांमार्फत वेळोवेळी अवयवदानाबाबत जनजागृती केली जात असली तरी रूढी, परंपरा अंधश्रद्धा यातून बाहेर न पडल्याने लोक अजूनही अवयवदानासाठी पुढे येत नाहीत. याविषयी सांगताना आरती गोखले म्हणाल्या, गेल्या वर्षी 68 ब्रेनडेड रूग्णांची नोंद झाली होती. यंदा आकडा 71 पर्यंत पोहोचला आहे. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान पुणे विभागात 62 किडन्या, 42 यकृत, 8 हदय, किडनी आणि यकृत 2, किडनी आणि स्वादुपिंड 4, कॉर्निझ 44 आणि त्वचा 6 असे प्रत्यारोपण झाले आहे. त्यामध्ये 1 यकृत झेटीसीसी मुंबई, 1 यकृत औरंगाबाद कडून पोहोचले. तर 1 फुफ्फुसाची जोडी चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलला व झेटीसीसी मुंबईला देण्यात आली. तरीही यातुलनेत अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा अधिक आहे. अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक स्वरूपात उभारण्याची गरज आहे. लोकांंमध्ये अवयवदानाबाबत लघुपट, व्याख्यान याबाबत जनजागृती केली जात आहे. .......अवयवदानाचे चित्र फारसे आशादायी नसले तरी अलिकडच्या काळात यात अंशत: वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात 71 ब्रेनडेडरूग्णांची नोंद झाली आहे. जवळपास 50 लोकांनी अवयदानाला मान्यता दिली तर काही वैद्यकीय कारणे वगळता त्यातील 42 अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले. -आरती गोखले, समन्वयक, पुणे झोनल ट्रान्सप्लांट को ऑर्डिनेशन सेंटर.
अवयव दान दिन विशेष : अवयदानासाठी अजूनही '' प्रतीक्षा '' च ..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 4:49 PM
अवयव दानाची अधिकाधिक जागृती होणे गरजेचे आहे.
ठळक मुद्देगेल्या सहा महिन्यात 71 ब्रेनडेडरूग्णांची नोंद लोकांंमध्ये अवयवदानाबाबत लघुपट, व्याख्यान याबाबत केली जात आहे जनजागृती