‘आॅस्कर’चे कार्यालय लवकरच मुंबईत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:34 AM2018-06-19T05:34:43+5:302018-06-19T05:34:43+5:30
- नम्रता फडणीस
पुणे : आॅस्कर अकादमीचे कामकाज कसे चालते, आॅस्कर पुरस्काराशिवाय अकादमी नक्की कोणते उपक्रम राबविते याची माहिती भारतीयांना व्हावी; तसेच संवाद आणि आदानप्रदानाचे दालन खुले व्हावे यासाठी ‘लॉस एंजिलिस’,‘न्यूयॉर्क’ आणि ‘लंडन’प्रमाणेच मुंबईमध्येही आॅस्कर अकादमीचे कार्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारबरोबरच विविध प्रकल्प राबविण्याची आॅस्कर अकादमीची इच्छा असल्याने केंद्राच्या एनएसडी किंवा फिल्म डिव्हिजनमध्ये या कार्यालयासाठीच्या जागेला प्राधान्य दिले जाणार आहे.
आॅस्कर अकादमीच्या सदस्य डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांनी अकादमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन हडसन यांच्यापुढे आॅस्कर अकादमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. डॉ. निरगुडकर यांनी डॉन हडसन यांच्याशी अकादमीच्या पहिल्याच भेटीदरम्यान आॅस्कर आणि भारतीय चित्रपटांची नाळ कशी जोडता येईल, भारतात कोणते प्रकल्प आणता येणे शक्य होईल, याविषयी चर्चा केली. भारतात तेही मुंबईत अकादमीचे कार्यालय निर्माण करण्याची इच्छा त्यांनी हडसन यांच्यासमोर व्यक्त केली. मात्र हा धोरणात्मक निर्णय असल्याने आॅस्कर अकादमीच्या प्रशासकीय मंडळासमोर हा प्रस्ताव मांडावा लागेल, असे त्या म्हटले असल्याचे निरगुडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आॅस्कर अकादमीचे कार्यालय मुंबईत असेल, तर सदस्यांची भारतात ये-जा राहील. त्यातून एक संवादाचा पूल निर्माण होईल. भारतीय चित्रपट जगभरात पोहोचविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. हे कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाशीही चर्चा केली जाणार असून, फिल्म डिव्हिजन किंवा एनएसडी मध्ये कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार आहे.