...अन्यथा काँग्रेसेची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल - केंद्रीय मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 03:28 PM2018-02-04T15:28:27+5:302018-02-04T15:31:12+5:30
भारतासह जगभरातील अनेक देशांमधील महिला विविध क्षेत्रात काम करत असून स्वत:वर होणा-या अन्याय अत्याचारा विरोधातही आवज उठवत आहेत.
पुणे: भारतासह जगभरातील अनेक देशांमधील महिला विविध क्षेत्रात काम करत असून स्वत:वर होणा-या अन्याय अत्याचारा विरोधातही आवज उठवत आहेत. भारतातील महिलांना होणारा त्रास संपविण्यासाठीच केंद्र सरकारने ट्रीपल तलाक विधेयक आणले. त्यामुळे काँग्रेस पक्षाने लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही या कायद्याला समर्थन द्यावे, अन्यथा त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल,असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी रविवारी केले.
केंद्रीय अर्थसंकल्पात लघु व मध्यम उद्योगांसाठी देण्यात आलेल्या गुंतवणूकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी या प्रसंगी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे,अमर साबळे,खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.
ट्रीपल तलाकच्या मुद्यावरून सरकार धर्मात लुडबुड करीत आहे. कुराणाने तीन तलाक सांगितले असून एका धर्माच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,असे वक्तव्य माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी औरंगाबादच्या हल्लाबोल मोर्चामध्ये केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा गिरिराज सिंग यांनी तिव्रविरोध केला.मात्र,शरद पवार हे देशाचे एक ज्येष्ठ नेते असून मला त्यांच्याबद्दल मला आदर आहे,असे नमूद करून गिरिराज सिंग म्हणाले, जगभरातील 22 मुस्लिम देशानी ट्रीपल तलाक कायदा संपुष्टात आणला आहे. त्या देशातही शरियत होते.आपल्या देशात ट्रीपल तलाकला सर्वाधिक विरोध करणारे राजकीय पक्षच आहे. खरतर मतदानाचे राजकारण करणारेच ट्रीपल तलाकच्या विरोधात असून त्याला शरियतशी जोडत आहेत. परंतु, महिलांना त्रास द्यावा,असे शरियतमध्ये कुठेही लिहून ठेवलेले नाही.
दरम्यान, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगाच्या बजेटमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 59 टक्के वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे लघु व मध्यम उद्योगांना अधिक चालना मिळणार असून कोट्यावधी हातांना रोजगार मिळणार आहे.केंद्र शासनातर्फे लवकरच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका गावात ‘सोलर चरखा’ योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या गावात 6 ते 10 हजार रुपयांचा रोजगार उपलब्ध होणार आहे.तसेच अधिकाधिक नव उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे, असेही गिरिराज सिंग यांनी सांगितले.