आमची मुले तणावाखाली अभ्यास करतायेत..!
By admin | Published: May 13, 2016 01:32 AM2016-05-13T01:32:36+5:302016-05-13T01:32:36+5:30
मुलांनी वर्षभर बारावी आणि मेडिकल सीईटीचा अभ्यास केला, खासगी क्लासेससाठी हजारो रुपये शुल्क भरून परीक्षेची तयारी केली. मात्र, सीईटी दिल्यानंतर दोन दिवसांनी ही परीक्षाच रद्द केल्याचे समजले.
पुणे: मुलांनी वर्षभर बारावी आणि मेडिकल सीईटीचा अभ्यास केला, खासगी क्लासेससाठी हजारो रुपये शुल्क भरून परीक्षेची तयारी केली. मात्र, सीईटी दिल्यानंतर दोन दिवसांनी ही परीक्षाच रद्द केल्याचे समजले. त्यामुळे मुले प्रचंड तणावाखाली आहेत. पुढील दोन महिन्यांत होईल तेवढा अभ्यासक्रम ते पूर्ण करतील. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या मुलांच्या तुलनेत राज्यातील मुलांना केवळ दोन महिन्यांचा कालावधी देणे न्यायाला धरून नाही. त्यामुळे केंद्र शासनाने याबाबत अध्यादेश काढून मुलांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.नीट परीक्षेबाबत राज्य व केंद्र शासनाचे धोरण स्पष्ट नाही. सीईटी परीक्षा दिल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांवर नीट परीक्षा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप आहे. राज्याच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य पद्धतीने मांडणे गरजेचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे जाऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करावा. ‘नीट’मधून राज्यातील विद्यार्थ्यांना यंदा सूट मिळावी याबाबत केंद्राने अध्यादेश काढावा, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
-राजेश टोपे,
माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
माझा मुलगा शुभंकर आफळे याने वर्षभर सीईटी परीक्षेचा अभ्यास केला. आता त्याला पुन्हा सीईटी परीक्षेची तयारी करावी लागत आहे. मात्र, ‘नीट’शिवाय आता पर्याय नाही, हे त्याला समजून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. शासनाच्या चुका झाल्या हे खरे आहे. शहरी भागातील मुले कसाबसा अभ्यास करतील; मात्र ग्रामीण भागातील मुले अधिक सफर होणार आहेत.
- रमा आफळे, पालक विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर पुन्हा दोन महिन्यांत नीट परीक्षा द्यावी लागणे, हा राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. केवळ दोन महिन्यांत विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार नाही. त्यामुळे केंद्राने अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
- कृष्णाथ दगडे, पालक
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांशी निगडित असलेल्या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली, त्याबद्दल ‘लोकमत’चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना अचानक सीईटी परीक्षा द्यावी लागते. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे पुण्यातील शेकडो पालकांनी येत्या १४ मे रोजी शनिवारवाड्यावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने पालक म्हणून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत ठोस पावले उचलावीत.
- दिलीप शहा,
शिक्षणतज्ज्ञ