पुणे : दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित ‘स्वदेश सेवा फाऊंडेशन’ व ‘बघतोय रिक्षावाला फोरम’ या स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही खास सेवा सुरू करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन नुकतेच येथे झाले. या उपक्रमांतर्गत ऑक्सिजन सिलिंडर व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज २५ ऑटोरिक्षा ॲम्ब्युलन्सचा ताफा तत्पर असून, त्यांची संख्या लवकरच १०० पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
उपक्रमाच्या समन्वयक तथा ‘स्वदेश सेवा फाऊंडेशन’च्या संस्थापक धनश्री पाटील म्हणाल्या की, रुग्णाचे घर गल्लीबोळात असल्यास रुग्णवाहिका तेथपर्यंत पोहोचणे अशक्य होते. यावर आम्हाला ऑटोरिक्षाचा वापर ॲम्ब्युलन्स म्हणून करण्याची कल्पना सुचली. या उपक्रमाला समाजहितैषी डॉ. धनंजय दातार यांनी पाठिंबा व संपूर्ण अर्थसाहाय्य दिले आहे.
‘बघतोय रिक्षावाला फोरम’चे संस्थापक डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, की रिक्षा ॲम्ब्युलन्सचे भाडे न परवडणाऱ्या गरिबांसाठी ही सेवा मोफत असेल व ज्यांना काही देणे शक्य आहे अशा सर्वसामान्यांना ती अल्प दरात उपलब्ध असेल.
‘अल अदील’ समूह समाजोपयोगी उपक्रमांच्या पाठीशीया उपक्रमाला अर्थसाहाय्य पुरविणारे डॉ. धनंजय दातार म्हणाले, की आमचा ‘अल अदील’ समूह समाजोपयोगी उपक्रमांच्या पाठीशी नेहमीच उभा राहतो. कोविड साथीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना हापूस आंब्यांच्या पेट्यांचे वाटप केले. आताही ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’सारख्या उपक्रमात वाटा उचलताना आम्हाला कृतकृत्य वाटत आहे.