‘पॅडमॅन’ अक्षयकुमार आज महिलांशी साधणार संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 06:37 AM2018-01-15T06:37:09+5:302018-01-15T06:37:39+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे.
पुणे : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार अतिशय हटके अंदाजात आपल्या चाहत्यांसमोर जाण्यास सज्ज आहे. पॅडमॅन चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधन करताना दिसणार आहे. सध्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा असून, अनेकांना चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. लोकमतने सखी मंच सभासदासाठी हा योग जुळून आणला असून, सोमवारी अक्षयकुमारसोबत त्यांना समोरासमोर संवाद साधता येणार आहे. या चित्रपटाचा ‘लोकमत’ मीडिया पार्टनर आहे.
सोमवारी दुपारी २ वाजता गेनबा सोपानराव मोझे प्रशाला येथे अक्षय कुमार ‘पॅडमन’ या चित्रपटाबद्दल दिलखुलास संवाद साधणार आहे. या वेळी यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. उषा काकडे व रोझरी ग्रुप आॅफ एज्युकेशनचे संचालक विनय आºहाणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उपस्थित सखींना त्यांच्या मनात असलेले सर्व प्रश्न अक्षयला विचारता येतील. या संवाद सत्रातून एका भाग्यवान विजेत्याला दस्तुरखुद्द अक्षयकुमारच्या हस्ते एक आकर्षक बक्षीसही जिंकण्याची संधी आहे. अक्षय नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये रमणे पसंत करतो. जेव्हा तो चाहत्यांसोबत असतो, तेव्हा स्टारपण विसरून त्यांच्यात मिसळतो. असाच काहीसा अनुभव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सखी मंच सभासदांनाही अक्षयला भेटण्याची आतुरता आहे. दरम्यान, अक्षयकुमारचा पॅडमॅन हा चित्रपट अरुणाचल मुरुगनाथम यांच्या संघर्षमय कथेवर आधारित आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
सुपर हीरो है ये पगला अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटात अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बॉलिवूडचा अॅक्शन हीरो अशी ओळख असलेला अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधत आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा पॅडमॅन हा चित्रपटदेखील याच पठडीतला आहे.
वेळ : १५ जानेवारी २०१८ रोजी
दुपारी २ वाजता.
स्थळ : गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, महाराष्ट: हाऊसिंग बोर्ड, येरवडा, पुणे ०६.
सखी मंच सभासदांना ओळखपत्रावर प्रवेश तसेच महिलांसाठी खुला.