पंढरपूर वारी ‘फोटो दुुनियादारी’
By admin | Published: May 10, 2017 04:20 AM2017-05-10T04:20:19+5:302017-05-10T04:20:19+5:30
पंढरीची वारी अनुभवणं प्रत्येकासाठी जमतंच असं नाही. त्यात ही देहू-आळंदी ते पंढरपूर एवढा मोठा पल्ला प्रपंचाच्या राहाटी गाठणं कठीण होतं. पण हा सोहळा मन भरून वारीत सहभागी न होता अनुभवता येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंढरीची वारी अनुभवणं प्रत्येकासाठी जमतंच असं नाही. त्यात ही देहू-आळंदी ते पंढरपूर एवढा मोठा पल्ला प्रपंचाच्या राहाटी गाठणं कठीण होतं. पण हा सोहळा मन भरून वारीत सहभागी न होता अनुभवता येणार आहे.
वारीतील फुगडी, भारुड, रिंगण, टाळकरी, मृदंगधारी, पालखीचे विविध घाटातील प्रवासाची विहंगम दृश्ये टिपली आहेत बाळासाहेब रतिकांत कोद्रे यांनी. त्यांचा २२ वर्षांतील ‘वारी’ फोटो दुनियादारी प्रवास म्हणजे ‘हा सुखसोहळा स्वर्गी नाही’ हे छाया चित्रप्रदर्शन.
बालगंधर्व कलादालनात आयोजित या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी श्री संत सोपानकाका संस्थान, सासवड येथील हभप गोपाळ गोसावी, भारतीय वारकरी मंडळाचे संदीप पळसे, नगरसेवक उमेश गायकवाड उपस्थित होते.
याबद्दल कोद्रे म्हणाले, हा फोटोग्राफीचा वारसा मला आईच्या आजोळकडून मिळाला आहे. खरं तर मी काढलेला वारीतील एका चांगल्या फोटोला प्रसिद्धी देण्यास नकार मिळाला होता. तिथं मला याची प्रेरणा मिळाली. पण ही साधना करताना अनेकवेळा आर्थिक, मानसिक अडचणी उभ्या राहिल्या. परंतु मित्र व कुटुंबाने या काळात खूप सहकार्य केले व प्रोत्साहानही
दिले.
हे प्रदर्शन ९ ते १२ मे या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.