पुणे : गुन्हे थांबवायचे असतील तर गुन्हेगारांना मारायची नव्हे, तर गुन्ह्याविषयी चर्चा करुन तोडगा काढण्यावर भर हवा. व्यक्ती अमानवीय तेव्हाच होतो जेव्हा सामाजिक परिस्थिती अमानवीय होते. समाजाच्या या अवस्थेस मनुवादी पुरुषसत्ताक व्यवस्था कारणीभूत आहे. आज देशातील अराजक परिस्थिती ही सत्ताधारी राजकीय वर्गाने पसरवली आहे,’ असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.अभिव्यक्ती संघटनेतर्फे ‘भय इथले संपत नाही- हैद्राबाद व उन्नाव बलात्कार प्रकरणी न्याय’ या विषयावर भारत इतिहास संशोधक मंडळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळेस माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अलका जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.अलका जोशी म्हणाल्या, ‘देशभरात महिलांविरोधात, अल्पवयीन मुलींविरोधात होणा-या हिंसाचाराने उच्चांक गाठला आहे. बलात्कार आणि हत्यांच्या घटनांनी लोकांमध्ये अस्वस्थता, नैराश्य आणि संताप निर्माण केला आहे. स्त्रियांवरील हिंसा शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक अशा अनेक प्रकारे केली जाते. स्त्री म्हणून दिली जाणारी दुय्यम वागणूक, भेदभाव, सतत नियंत्रण ठेवणे, निर्णय घेऊ न देणे, स्वातंत्र्य नाकारणे ही देखील हिंसाच आहे.’ ‘गेल्या काही वर्षात भांडवली बाजार व्यवस्थेने समाजातील पितृसत्तेला खतपाणी दिले आहे. विविध जाहिरातींमधून अधिक नफा कमावण्यासाठी स्त्री देहाचा बाजार मांडला आहे. आपण पितृसत्तेशी लढा देण्याबद्दल बोलतो, तेव्हा तिचा समूळ नाश भांडवलशाहीच्या नाशाबरोबरच होऊ शकतो. समाजामध्ये स्त्रीला समानतेची वागणूक मिळावी आणि तिचा आत्मसन्मान व स्वायतत्ता जोपासली जाईल असे वातावरण तयार व्हावे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले.पूनम मंगल यांनी सूत्रसंचालन केले. लोकायत संघटनेची सांस्कृतिक आघाडी असलेल्या ‘काफीला’ने कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी लोकायतचे निरज जैन, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांमुळेच देशात अराजकाची परिस्थिती: बी.जी.कोळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 8:59 PM
गुन्हे थांबवायचे असतील तर गुन्हेगारांना मारायची नव्हे, तर गुन्ह्याविषयी चर्चा करुन तोडगा काढा..
ठळक मुद्दे‘भय इथले संपत नाही- हैद्राबाद व उन्नाव बलात्कार प्रकरणी न्याय’ या विषयावर व्याख्यान