‘ब्लँक मनी’च्या बहाण्याने दिले ‘५० लाखां’चे कागद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:11+5:302021-03-17T04:10:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ब्लॅक मनी’ बाळगण्यासाठी २ हजारांच्या नोटा हव्यात. त्या बदल्यात दुप्पट पैसे देतो,’ या आमिषाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ब्लॅक मनी’ बाळगण्यासाठी २ हजारांच्या नोटा हव्यात. त्या बदल्यात दुप्पट पैसे देतो,’ या आमिषाला हुरळलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या हाती ५० लाख रुपयांच्या बदल्यात निव्वळ कागद आले. या फसवणूक याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
प्रविण वनकुंद्रे (रा. काळेवाडी), महेश गावडे (रा. चिंचवड) आणि डॉ. व्यंकटरमण बाहेकर (रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुनिल नारखेडे (रा. नागपूर), रेड्डी (रा. हातनाका, ठाणे) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवणे येथील हॉटेल व्यावसायिकाने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी प्रविण नवकुंद्रेच्या सांगण्यावरुन नाशिक येथील फायनान्स कंपनीत गुंतवणुक केली होती. मात्र, त्या कंपनीने फसविल्याने फिर्यादी हे वनकुंद्रेला ‘तू माझे पैसे मिळवून दे’, असे सांगत होते. त्यावर वनकुंद्रेने इतर आरोपींशी संगनमत करुन त्यांच्याकडे खूप ब्लॅकमनी असल्याचे फिर्यादींना भासविले. तो काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी त्यांना २ हजार रुपयांच्या नोटा हव्यात. त्यामुळे त्या साठवून ठेवणे त्यांना सोपे जाईल. त्यासाठी ते २५ लाख रुपयांच्या बदल्यात ५०० रुपयांच्या नोटांचे ५० लाख रुपये देण्यास तयार असल्याचे आमिष दाखविले.
त्याप्रमाणे फिर्यादीने २ हजार रुपयांच्या नोटांचे २५ लाख रुपये जमवले. फिर्यादीला २३ फेब्रुवारीला दुपारी कसबा पेठेतील जन्म-मृत्यु नोंदणी कार्यालयाजवळ बोलावले. त्यानुसार फिर्यादी तेथे गेल्यावर त्यांनी आणलेले २५ लाख रुपये एका सुटकेसमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले. त्यांनी पैसे ठेवल्यावर आरोपींनी सुटकेस लॉक केली. त्यांनी ती बॅग कारमध्ये ठेवली. तेव्हा फिर्यादींच्या लक्षात आले की आरोपींनी त्यांना पैसेच दिले नाहीत. हे फिर्यादीने सांगितल्यावर आरोपींनी कारमधील एक बॅग काढून त्यांच्या हातात दिली. “आमच्यासमोर ही बॅग उघडून पाहू नका,” असे सांगून आरोपी जाऊ लागले.
फिर्यादींना संशय आल्याने त्यांनी बॅग उघडून पाहिल्यावर त्यात नोटांच्या आकाराचे वर्तमानपत्राच्या कागदाचे तुकडे बंडल करुन ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पैसे परत न दिल्याने शेवटी हॉटेल व्यावसायिकाने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील अधिक तपास करीत आहेत.