मॉरिशसच्या मराठी बांधवांची जेजुरीत पूजा, १८६४ साली विदेशात स्थायिक झालेल्या परिवारांच्या कुटुंबीयांची आस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:30 AM2018-04-04T02:30:21+5:302018-04-04T02:30:21+5:30
सन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे.
जेजुरी - सन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे. या परिवारातील सुमारे ३० सदस्य जेजुरीत खंडेरायाच्या देवदर्शनासाठी आले असून शनिवारी (दि .७) ते स्वत: खंडेरायाचा जागरण गोंधळ, तळी-भंडार, लंगर तोडणे, खंडोबाची देवीची गाणी, जात्यावरची गाणी भारुड सादर करीत मॉरिशस मध्येही जोपासलेल्या मराठी परंपरा व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत.
ही कुटुंबे मॉरिशस येथे स्थायिक झाली. त्यावेळी त्यांचेकडे कुलदैवत खंडेरायासह तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरच्या अंबाबाईचे टाक होते. उदरनिर्वाह करताना गाव, देश सोडला असला तरी या परिवारांनी आपली धार्मिक मराठी परंपरा सोडली नाही. कुलदैवतांचे सण, उत्सव मोठ्या श्रद्धेने तेथे केले जात असत हीच परंपरा पाचव्या पिढीने म्हणजेच अनिल भोसले-लक्ष्मण, त्यांची पत्नी मीनाक्षी भोसले लक्ष्मण, वृशांत म्हाडकर-गायकवाड, मल्हारी आबाजी परब, जयश्री रामा आबाजी परब, प्रशिक शिकानंद हिरू पवार, मनीषा हिरू राघू पवार, राजेंद्र कुमार पडूं पंढरकर, हिराबाई लखना आदींनी जोपासली आहे. या परिवारातील ३० सदस्य भारतात आलेले असून तुळजापूर, कोल्हापूर, नेवासा चांदनपूर, व खंडोबाच्या ११ स्थळांना भेटी देत आहेत. सध्या त्यांचा निवास जेजुरीत आहे.
सुमारे १५० वर्षांपूर्वी मराठा समाजातील आमचे पूर्वज मॉरिशस येथे स्थायिक झाले. त्यांनी येथील धार्मिक विधी, सण उत्सवांची परंपरा जोपासली होती. तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. मॉरिशसची लोकसंख्या १२ लाख असून सुमारे ३० हजार मराठी परिवार तेथे स्थायिक झालेले आहेत.
जात्यावरच्या ओव्यांपासून विधींना सुरुवात होते. जागरण-गोंधळ, पारंपरिक गीते व लंगर तोडणे, तळी भंडार विधी केले जातात. देवाची भूपाळी, आरत्या, लोकगीते, अभंग या परिवाराला मुखोदगत आहेत. जेजुरीप्रमाणेच चंपाषष्ठी उत्सव सहा दिवस साजरा होतो. इटली व इंग्लंड मध्येही काही सदस्य स्थायिक आहेत. त्या ठिकाणी फक्त गोंधळ साजरा केला जातो, मॉरिशसमध्ये फ्रेंच आणि आफ्रिका मिळून क्रिओल भाषा बोलली जात असली तरी मराठी बांधव शुद्ध मराठीतून बोलतात. तेथील शाळेत ५० मिनिटांचा मराठीचा तास घेतला जात असून त्यामध्ये महापुरुषांचा इतिहास, मराठी देवदेवता, सण, उत्सवांचे महत्व आदी शिकवले जातात, अशी माहिती तेथील मराठीच्या शिक्षिका हिराबाई लखना यांनी दिली. भोसले यांच्या मॉरिशस येथील जगदंबे निवास या ठिकाणी खंडोबा व तुळजाभवानी मंदिर आहे. सध्या सर्व सदस्य भारतात आलेले असून कुलदैवतांच्या स्थळांना भेटी देत आहेत.
श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाकडून मॉरिशसवासीय मराठी परिवाराची भेट घेत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शनिवारी (दि.७) त्यांचे हस्ते पहाटेची भूपाळी, आरती करण्यात येणार आहे. सायंकाळी या परिवारातील सदस्य जयमल्हार सांस्कृतिक भवनमध्ये जात्यावरची ओवी, जागरण गोंधळ, तळीभंडार देवीच्या आरत्या आदी विधीतून लोक कलेचेव धार्मिक परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. विदेशात राहूनही आपली संस्कृती जतन केल्याबद्दल या कुटुंबीयांचे विशेष कौतुक होत आहे. देवसंस्थानकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
विधीवत साजरे केले जातात सर्व सण
आम्ही आषाढी कार्तिकी एकादशी, गणपती उत्सव, महाशिवरात्री या उत्सवांसह खंडोबाचे सोमवती अमावस्या, पौष, माघ, चैत्रपौर्णिमा, चंपाषष्ठी उत्सव साजरे करतो. गारमेंट (कापड दुकान) असलेले अनिल भोसले व त्यांची पत्नी मीनाक्षी जेजुरी प्रमाणेच खंडोबाचे वर्षातील उत्सव धार्मिक विधी साजरे करताना वाघ्या-मुरुळी म्हणून कार्य करतात. उच्चपदस्थ अधिकारी असलेले वृशांत पंढरकर हे सुद्धा देवाचा वाघ्या बनतात, जागरण गोंधळ करताना देवाला लागणारी हळद (भंडारा)जात्यावर दळली जाते.