पुणे : संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एसटी महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहोचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे. प्रशासनाने लाखो पासधारकांना अंधारात ठेवून फसवणूक केल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.मागील वर्षी ऐन दिवाळीत एसटी महामंडळातील कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे पासधारकांना चार दिवसांचा पास वापरता आला नाही. दि. १७ ते २० आॅक्टोबर असे चार दिवस बस पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे आधीच पैसे देऊन मासिक किंवा त्रैमासिक पास घेतलेल्या प्रवाशांचे चार दिवसांचे पैसे वाया गेले होते. त्यामुळे या चार दिवसांची भरपाई मिळावी, यासाठी प्रवाशांकडून मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ही मागणी मान्य करीत एसटीच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) दि. ३० जानेवारी रोजी परिपत्रक काढून दि. २८ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत पासचा कालावधी वाढवून देण्याचे आदेश दिले होते.प्रत्यक्षात अनेक प्रवाशांपर्यंत या मुदतवाढीबाबत माहितीच पोहोचली नसल्याचे समोर आले आहे. दररोज सासवड ते स्वारगेट असा एसटीने प्रवास करणारे दत्तात्रय फडतरे हे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिपत्रकाबाबत प्रवाशांना काहीच माहिती नाही. प्रवाशांना याबाबत अंधारात ठेवल्याने सवलत मिळू शकली नाही.यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगार व्यवस्थापकांना राहतील. ही मुदतवाढ सध्या काढलेल्या पासावरच असेल. हे पत्र सर्वसंबंधित तसेच वाहकांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. याबाबतची माहिती पासधारकांना सहजपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे, वृत्तपत्रांमध्ये याबाबत प्रसिद्धी देणे, सोशल मीडियावर प्रसार करणे आवश्यक होते.मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांना अंधारात ठेवून फसवणूक केली आहे. आगारप्रमुखांना याबाबत विचारले असता त्यांनी कुणाचीही तक्रार न आल्याने हे परिपत्रक लावले नाही, असे सांगितले.>मुख्यमंत्र्यांकडे तक्रारपरिपत्रकाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवल्याबाबत दत्तात्रय फडतरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसेचदि. २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत संपल्याने बहुतेकांना चार दिवसांची मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा हा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.>पासधारक अनभिज्ञएसटी प्रशासनाने दि. ३० जानेवारीला सर्व आगारप्रमुखांना मुदतवाढीबाबत कळविले होते. परिपत्रकानुसार दि. २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, ज्या पासधारकांनी ३० जानेवारीपूर्वी पास काढले आहेत, ते पुन्हा पास घेण्यासाठी आगारात गेले नाहीत. एक महिन्याचा पास संपल्यानंतर पास काढण्यासाठी गेल्यानंतरही त्यांना याबाबत सांगण्यात आले नाही. तसेच पास केंद्रावरही कोणतीही माहिती लावण्यात आली नव्हती. त्यामुळे परिपत्रकाबाबत पासधारक अंधारातच राहिले, अशी तक्रार पासधारकांनी केली आहे.>पासला मुदतवाढ देण्याबाबतचे परिपत्रक मिळाले होते. या परिपत्रकाच्या प्रसिद्धीचे काम मुंबई येथील कार्यालयातून होते. आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांना याबाबत माहीत आहे. पासधारक आमच्याकडे आले असते तर त्यांना ही सवलत दिली असती. महिनाभरात एकही पासधारक आले नाहीत. त्यामुळे पासला मुदतवाढ देता आली नाही. - पुणे विभागातील एक आगारप्रमुख
पासची सवलत राहिली कागदावरच, संपकाळात दिले होते आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:18 AM