बीआरटी मार्गावर प्रवासी असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:51 AM2018-05-15T01:51:56+5:302018-05-15T01:51:56+5:30

गतिमान बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले सर्वच ‘बस रॅपिड ट्रान्झिट’ (बीआरटी) मार्ग प्रवाशांसाठी अजूनही असुरक्षितच आहेत.

Passengers on the BRT route are unsafe | बीआरटी मार्गावर प्रवासी असुरक्षितच

बीआरटी मार्गावर प्रवासी असुरक्षितच

Next

पुणे : गतिमान बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले सर्वच ‘बस रॅपिड ट्रान्झिट’ (बीआरटी) मार्ग प्रवाशांसाठी अजूनही असुरक्षितच आहेत. हे मार्ग रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या सातारा रस्त्यावरील बीआरटीचीही तिच स्थिती आहे.
शहरात पहिल्यांदा ‘स्वारगेट ते कात्रज’ मार्गावर बीआरटी सुरू करण्यात आली. हा पथदर्शी प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे लोटली. या बीआरटीमध्ये सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी आढळून आल्या. त्या त्रुटी आजअखेरपर्यंत कायम आहेत. हा मार्ग रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत होती. वर्षानुवर्षे प्रवाशांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या या मार्गाचे नूतणीकरण केले जात आहे; मात्र त्यातही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ‘स्वारगेट ते कात्रज’ मार्गानंतर शहरात हडपसर रस्त्यावर २ ते ३ किमी अंतराचा अर्धवट बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. त्यापाठोपाठ ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी,’ ‘येरवडा ते वाघोली’ तसेच पिंपरी-चिंचवड शहरातही काही मार्ग सुरू करण्यात आले. हे सर्वच मार्ग प्रवाशांसाठी कसरतीचे ठरत आहे. पथदर्शी मार्गातील त्रुटी इतर मार्गांमध्येही कायम दिसून येत आहेत.
नव्याने तयार होत असलेल्या कात्रज बीआरटी मार्गावर सध्या बस प्रवाशांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी सुविधा नसल्याचे दिसून येत आहेत. ‘येरवडा ते वाघोली’ आणि ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ मार्गावर काही बसथांब्यांच्या लगत प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे तसेच गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर वाहने सुसाट जातात. एक-दोन ठिकाणी पूल व भुयारी मार्ग आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेले रबराचे गतिरोधक काढण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरते. विशेषत: महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. सायंकाळी बहुतेक मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या वेळेत रस्ता ओलांडणे अधिक धोकादायक ठरते.
>समितीने केली पाहणी
सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता आणि संगमवाडी रस्त्यावरील बीआरटी मार्गासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन केली आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी पीएमपीचे सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. या समितीने बीआरटी मार्गाची पाहणीही केली, त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींबाबत पालिकेच्या संबंधित विभागाला सुधारणा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
समितीकडून येरवडा ते वाघोली मार्गाची पाहणी केल्यानंतर, त्याबाबतच्या त्रुटींबाबत पालिकेला कळविले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना मुख्य रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी ठिकठिकाणी रिफलेक्टर्स बसविणे, फलक लावणे, विविध चिन्हे लावणे आवश्यक आहे. याबाबत सूचित करण्यात आले आहे.
- अजय चारठणकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Web Title: Passengers on the BRT route are unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.