पुणे :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांच्या २१ जागांसाठी २९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सोमवारी अखेरच्या दिवशी १८७ अर्ज दाखल झाले. आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
जिल्हा बँकेसाठी आठ मतदारसंघात २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विविध सहकारी संस्थांचे सभासद असलेले सुमारे ५ हजार १६६ मतदार बँकेसाठी मतदान करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अंतिम मुदत होती. अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन अर्ज दाखल करण्याची वेळ एक तासाने वाढविण्यात आली होती. अखेरच्या दिवशी १८७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. बँकेच्या २१ जागांसाठी २९९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सोसायटी अ वर्ग गटासह यावेळी अन्य सर्व गटांमध्ये चुरस आहे. भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या विद्यमान संचालकांसह अन्य सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्जांची छाननी : ७ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज मागे घेणे : ८ डिसेंबर ते २२ डिसेंबर
- जिल्हा बँकेसाठी मतदान : २ जानेवारी २०२२
- मतमोजणी : ४ जानेवारी
जिल्हा बँकेचे संचालक मंडळ : २१
- अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : १३
- ब मतदार संघ : १
- क मतदार संघ : १
- ड मतदार संघ : १
- अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : १
- इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : १
- विभक्त जाती व प्रजाती : १
- महिला प्रतिनिधी : २
विरोधी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून काळे यांचे चक्क ३४ अर्ज
नवीन सहकार कायद्यानुसार एका उमेदवाराने किती अर्ज दाखल करावे याचे बंधन नसल्याने व एका सूचकाने दोन उमेदवारांच्या अर्जावर सही केल्यावर दोन्ही अर्ज बाद होतात. या नियमांचा गैरफायदा घेत जुन्नर तालुक्यातील विद्यमान संचालक, माजी उपाध्यक्ष संजय काळे यांनी चक्क ५५ उमेदवारी अर्ज विकत घेऊन तब्बल ३४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
राज्यमंत्री भरणे यांचे दोन गटांत अर्ज
गेल्या अनेक वर्षांपासून बँकेचे संचालक असलेल्या व सुरक्षित ब गटातून(पणन) निवडून येणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी चक्क दोन गटांतून ब गट व अनुसूचित जातीजमाती गटातून देखील उमेदवार अर्ज दाखल केला आहे. पणन गटातून भरणे यांच्या विरोधात भाजपने अर्ज दाखल गेल्याने खबरदारी म्हणून भरणे यांनी अन्य गटातून अर्ज दाखल केला आहे.