जागतिक अहिंसा दिनी शांती मार्च; ‘युध्द नको बुद्ध हवा, ‘हम सब एक है’च्या घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:09 PM2017-10-02T13:09:26+5:302017-10-02T13:31:10+5:30
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्तपणे आज सकाळी शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : गांधी जयंती (दि. २) हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्तपणे आज सकाळी शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
सेनापती बापट पुतळा, अलका चौक, सीटी पोस्ट अशा मार्गे शनिवार वाडा येथे शांती मार्च चा समारोप झाला. शनिवार वाडा येथे 'थाळीनाद' करण्यात आला. जाहेदभाई, चित्रलेखा जेम्स हे धर्मगुरू शांती मार्च मध्ये सहभागी झाले होते. संदीप बर्वे, अप्पा अनारसे, श्रीपाद ललवाणी, मयुरी शिंदे, यल्लपा धोत्रे, सचिन पांडोळे, अजय हाप्पे, अतूल पोटफोडे, जांभुवंत मनोहर आदी कार्यकर्त्यांनी शांतीमार्चचे संयोजन केले. माहेर संस्थेचे सदस्य, 'कोपरे गाव' चे ग्रामस्थ, मोहोळ विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. 'युध्द नको बुद्ध हवा', 'हम सब एक है' अशा घोषणा देण्यात आल्या.
संदीप बर्वे म्हणाले, भारतीय राज्य घटनेवर निष्ठा असणार्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दंगलमुक्त समाजासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. यासाठी हा 'शांती मार्च' आयोजित करण्यात आला होता. पुणे शहर दंगलमुक्त राखण्याचा आमचा संकल्प व ठाम निर्धार आहे. समाजात अमन सर्वांत महत्त्वाचे असते.
चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, 'हिंसामुक्त समाज हा प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे. परंतु दुदेर्वाने समाजातील काही घटकांच्या अविचारी कृत्यांमधून समाजातील शांतता ढळते. अशावेळी महात्मा गांधीचे विचार समाजात रुजण्याची आवश्यकता लक्षात येते. त्या दृष्टीने महात्मा गांधींच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून २ आॅक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन. हा दिवस जगभर ह्यजागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. धर्म, जात, रंग, भाषा आणि अनेक कारणांसाठी भिन्न असणारे आपण भारतीय म्हणून एक आहोत. शेकडो वर्षांपासून एकोप्याने राहण्याची आपली समृद्ध परंपरा आहे.'