हुंडा प्रथेला ग्रासलेल्या स्मिताची शिखरभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:02+5:302021-08-22T04:14:02+5:30
मूळच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील असणाऱ्या स्मिता घुगे या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहेत. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय तर आई ...
मूळच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील असणाऱ्या स्मिता घुगे या काही वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहेत. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय तर आई गृहिणी आणि एक बहीण असून तिचेही लग्न झाले आहे. साधारण मध्यमवर्गीय घुगे कुटुंबीय. त्यामुळे मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर स्मिताचे २२ वयापासून विवाह जुळवण्यास सुरुवात झाली. त्यासाठी मुलांकडील लोक पाहण्यासाठी येऊ लागले. सुरुवातीला स्मिता यांच्या उंचीबाबत दोष काढू लागले. एमएस्सी होऊनही नोकरी का करत नाही, म्हणून डावलले जाऊ लागले, त्यानंतर नोकरी लागली. स्वत:च्या हिमतीवर स्पॅनिश भाषा शिकून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत जॉबही लागला. मात्र, हे सर्व करत असताना त्यांना हुंडा प्रथेलाही सामोरे जावे लागले. उंची कमी असल्याने २० ते ५० लाखांपर्यंत हुंड्याची मागणी होऊ लागली. हुंडा देण्यास नकार दिल्यामुळे अनेक मुलांनी मला नाकारले. एखाद्या उच्चवर्णीय कुटुंबात जायचे म्हटले तर मध्यमवर्गीय कुटुंबाला हुंडा दिल्याशिवाय पर्याय नाही हे पुन्हा एकदा पुढे आले. एकूणच कमी उंची आणि हुंडा या दोन प्रश्नांमुळेच स्मिताच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.
हुंडा प्रथेची समस्या भेडसावत असतानाच आजूबाजूचे लोक वारंवार लग्न कधी करणार किंबहुना का होत नाही, अशा अनेक प्रश्नांचा डोंगर उभा करत होते. त्यातूनच एक दिवस ट्रेकिंग संदर्भात स्मिताला ३६० एक्स्प्लोरर या संस्थेच नोटिफिकेशन मिळाले. २६ जानेवारी २०१९ला कळसूबाई शिखर सर करताना आनंद बनसोडे यांच्या संपर्कात ती आली. एकीकडे कमी उंची आणि हुंडा देता येत नसल्याने स्मिताच्या मनाची कुचंबणा होत होती. पण दुसरीकडे या सर्वावर मात करण्यासाठी आपल्याला असे काही तरी करायचे आहे की हे सर्व त्या कर्तृत्त्वाच्या उंचीपुढे झाकून जाईल. यासाठी तिच्या मनात सतत वादळ घोंगावतच होत. अखेर तिने गिर्यारोहणाचा मार्ग धरला. त्यासाठी रोज सकाळी तळजाई पठारावर चालणे, झुंबा, कार्डिओ, एरोबिक्स स्मिता करू लागली. कारण तिला दुसरा कसलाही अनुभव नव्हता. तरीही स्मिताने जानेवारी २०२१ ला कोकणकडा सर केला. त्यानंतर आपल्याला आता असे काही तरी करायचे आहे की जेणे करून आपले कर्तृत्वापुढे या रुढी परंपरा झाकून जातील. त्यातूनच उन्हाळा, पावसाळा, वाळवंट यासारखे अनुभव येणारे आफ्रिका खंडातील सर्वात उंच आणि खडतर अशा माउंट किलीमांजारो हे शिखर सर करण्याचा निर्णय घेतला.
हे शिखर सर करण्यासाठी साडेतीन लाख खर्च अपेक्षित होता. परंतु, लॉकडाऊनमुळे विमा वगैरेच्या किमती वाढल्याने पाच ते साडेपाच खर्चाची तरतूद गेली. एवढे पैसे कोठून आणायचे हा प्रश्न स्मिताला पडला. अनेक सामाजिक संस्था, व्यक्तींकडे मदत मागितली. पण कोणीही पुढे आले नाही. आधीच एक संकटातून बाहेर पडलेल्या स्मिताने दुसऱ्या संकटाला धैर्याने तोंड दिले. तिने लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने विकून हे शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी तिचा हा प्रवास सुरू झाला आहे. घनदाट जंगल, चिखलाचा रस्ता पार करत असताना क्षणात ऊन तर क्षणात पाऊस अशा वातावरणाशी जुळवून घेत स्मिता आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करत होती. अनेक संकटे आली पण त्यावर मात करत हे शिखर तिने सर केलेच. तेथे पोहोचल्यानंतर स्मिताने देशाचा झेंडा फडकावलाच पण, रुढी, प्रथा, परंपरेपेक्षा कर्तृत्व खूप मोठे असते हे दाखवून दिले.
आता पाहू कोण मला स्वीकारतंय?
आपल्या मोहिमेविषयी बोलताना स्मिता घुगे म्हणाली, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला किती समस्यांना सामोरे जावे लागते हे माझ्या विवाह जुळवण्याच्या प्रसंगी लक्षात आले. त्यातूनच खर तर मला हे शिखर सर करण्याची प्रेरणा मिळाली. कळसूबाई, कोकणकडा वगळता मी कोणतेही शिखर वगैरे सर केले नाही. पहिल्याच प्रयत्नात किलीमांजारो हे शिखर सर केले, याचा मला खूप आनंद होत आहे. ही सफर करत असताना अनेक संकटे आली. पैशापासून ते तेथे गेल्यानंतर खाण्याचे, पिण्याचे. याशिवाय चालत जाताना तेथील वातावरणाशी जुळवून घेतला अडचणी आल्या. पुढे काही दिसत नव्हते. सगळीकडे दाट धुके होते. पण आपल्या पडणाऱ्या पहिल्या पावलाकडेच लक्ष केंद्रीत करत शिखर सर केले. एवढच सांगायचं आहे की रुढी, परंपरेपेक्षा मुलीचे कर्तृत्वही जाणून घेणे गरजेचे आहे. आज माझ्या उंचीपेक्षा मोठ्या असणाऱ्या कर्तृत्वाला गवसणी घातली आहे. त्यामुळे मला पाहायचं आहे की कोण मला स्वीकारतंय?
दुर्गेश मोरे
फाेटो