पेन इंटरनॅशनल काँग्रेस परिषद : विद्यापीठामध्ये फुलणार ‘भाषाबन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:37 AM2018-09-29T03:37:13+5:302018-09-29T03:37:51+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये जगभरातील सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘भाषाबना’चे उद्घाटन करण्यात आले. पेन इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांमधील साहित्यिकांच्या हस्ते या भाषाबनामधील रोपांची लागवड करण्यात आली.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये जगभरातील सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘भाषाबना’चे उद्घाटन करण्यात आले. पेन इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांमधील साहित्यिकांच्या हस्ते या भाषाबनामधील रोपांची लागवड करण्यात आली. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची विविध देशांमधून आलेल्या पेन सदस्यांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रा. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांच्यासहित पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर, अध्यक्ष जेनिफर क्लेमंट, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी हेदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. खरे यांनी विद्यापीठाच्यावतीने सुमारे ८० देशांमधून आलेल्या सुमारे १८० साहित्यिकांचे स्वागत केले.
‘‘या परिषदेसाठी आज येथे उपस्थित राहणे ही माझ्यासाठी अत्यंत बहुमानाची बाब आहे. या परिषदेनिमित्त माझ्या डॉ. गणेश देवी यांच्या झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी मला येथे होणाऱ्या वृक्षलागवडीमधील सर्व वृक्ष हे ‘धर्मनिरपेक्ष’ असतील, असा निर्वाळा दिला होता. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आम्ही सर्व हे भाषाबन पाहण्यासाठी जरूर परत येऊ,’’ असे क्लेमंट म्हणाल्या. पेन इंटरनॅशनल संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर यांनी पेन इंटरनॅशनल आणि मानवतेस जगातील विविध भाषणाचे प्रतिनिधित्व करणाºया या भाषाबनाची भेट दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आभार मानले.
विज्ञान व सामाजिक शास्त्रांसहितच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनेक भाषांचेही शिक्षण दिले जाते. आज या भाषाबनामध्ये लागवड करण्यात आलेल्या सर्व रोपांची व सर्व भाषांचेही आम्ही रक्षण करू. पुढील पिढीसाठीही हा एक प्रकारचा वारसा असेल. भाषाबनाची ही अत्यंत नावीन्यपूर्ण संकल्पना पाहण्यासाठी विद्यापीठात अनेक जण येतील, असा विश्वास
डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केला. सचिन इटकर यांनी आभार मानले.
जागतिक भाषावारीत मराठीचे नेतृत्व
पुणे : प्रत्येक भाषेचे चार पद्धतीने होणारे उच्चार अथवा भाषेची ओळख हातात घेतलेले फलक... महाराष्ट्राची परंपरा असलेल्या विविध पारंपरिक दिंड्यांचा सहभाग... आणि मराठी मौखिक परंपरेतील संतजनांचे करण्यात येणारे नामस्मरण... सादर झालेले अभंग अशा माध्यमातून जागतिक भाषावारीत सहा हजार भाषांचे वैभव आणि वारकरी संस्कृतीचा निनाद दुमदुमला. सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि पेन इंटरनॅशनल काँग्रेस यांच्या वतीने विद्यापीठ ते बालगंधर्व रंगमंदिर अशी जागतिक भाषावारी काढण्यात आली. यामध्ये विविध संलग्न महाविद्यालयातील तीन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. कुलगुरू एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर, अध्यक्ष जेनिफर क्लेमंट आणि निमंत्रक व ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी उपस्थित होते. ही भाषावारी विद्यापीठातून सेनापती बापट मार्ग, सिंबायोसिस बापट मार्ग, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, तुकाराम पादुका चौक, घोले रस्ता ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत काढण्यात आली.