पुणे : जिल्ह्यातील ताडी विक्रेत्यांकडून ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळयुक्त ताडी विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ही भेसळयुक्त ताडी पिणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील 12 भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले.तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पुणे जिल्हयाचे राज्य उतपादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी दिली.
याबाबत झगडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्हातील मंजूर ताडी विक्री करणा-यांकडून ताडी नमुन्यामध्ये क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळ केलेल्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य उतपादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे जिल्हयातील 16 ताडी विक्रेत्यांची तपासणी करून नमुने ताब्यात घेतले . त्यानंतर हे नमुने मुंबई येथील हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत जिल्ह्यातील 12 ताडी विक्रेत्यांच्या ताडी नमुन्यामध्ये क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळ केल्याचे सिध्द झालेले आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी संबंधित 12 ताडी विक्रेत्यांकडून महाराष्ट्र ताड़ी (अनुज्ञप्ती) देणे व ताडी छेदणे नियम, 1968 मधील नियम, 18, 20(ब) (ड),24, 29 व ट.ड.। अनुज्ञप्ती क्र.5 व 7 चे उल्लंघन केले असून, ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट हा पदार्थ मिसळून भेसळ करतात. त्यामुळे भेसळयुक्त ताडी सेवनाने मानवो प्रकृतीवर घातक परिणाम होतो ही बाब स्पष्ट होत असल्याने जनहितार्थ सदर अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करुन अनुज्ञप्तीधारका विरुध्द नियमानुसार गुन्हा नोंद करुन फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याचे आदेश देशमुख यांनी दिले. --- या बारा ताडी विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द व फौजदारी गुन्हे दाखल - 1) अशोक साहेबराव भंडारी, ताडी दुकान कळंब वालचंदनगर, 2) चंद्रकांत हनुमंत शिंदे, इंदापूर, 3) बसबराज बालाप्पा भंडारी, मुळशी, 4) सुरेश मिमराब भंडारी, दौंड, 5) लक्ष्मीनारायण फकिरय्या गौड, इंदापूर,6) अविनाश प्रल्हाद भंडारी, पुरंदर, 7) विजय गोपीनाथ भंडारी, इंदापूर, 8) निलम साया गौड,मावळ,9) अमृत माणिक भंडारी,आंबेगाव, 10) व्यकंटेश दस्तय्या कलाल, मुळशी11) चंद्रकांत हनुमंत शिंदे, इंदापूर 12) राजशेखर अनंतराम गौड, इंदापूर