पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. महेश आनंद जातेगावकर (वय ४२, रा. राधिका हौसिंग सोसायटी, विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळ, सिंहगड रस्ता) असे या शिपायाचे नाव आहे.
तक्रारादाराचे वडिलांचा ससून रुग्णालयात २३ डिसेंबरला मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयाच्या आवारात महापालिकेचे जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. तक्रारदार जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखला घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिपाई जातेगावकर याने त्यांना सुमारे दीड तास बसवून ठेवले व त्यानंतर त्याने मृत्यु दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडे ८०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारादाराने तडजोडीत ५०० रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
ससून रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच घेताना जातेगावकरला पकडण्यात आले. पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राजू चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.