सुविचार लिहीणारा माेदी समर्थक दिसताे ; रावतेंचा टाेला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 06:48 PM2019-01-24T18:48:01+5:302019-01-24T18:50:10+5:30
‘व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार’ हा फलक पाहून व्यसनाचा धिक्कार करून विकास योजनांना हातभार लागणार कसा? या सुविचारावर रावते यांनी ‘लिहणारा मोदी समर्थक दिसतो.’ म्हणताच उपस्थितांमध्ये हशा उसळला.
पिंपरी : वल्लभनगर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगारात चालक, वाहक विश्रांती कक्षाच्या उद्घाटनास परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. यावेळी कक्षातील ‘व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार’ हा फलक पाहून व्यसनाचा धिक्कार करून विकास योजनांना हातभार लागणार कसा ? या सुविचारावर रावते यांनी ‘लिहणारा मोदी समर्थक दिसतो.’ म्हणताच उपस्थितांमध्ये हशा उसळला.
शिवसेना आणि भाजपाच्या युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे. शिवसेना आणि शिवसेना नेते भाजपा आणि नेत्यांना कोंडीत पकडण्याचे सोडत नाहीत. टीकेतूनही स्वानंद घेत असतात. असाच एक किस्सा आज घडला. पुणे-मुंबई महामार्गावरील वल्लभनगर आगारात रोटरी क्लब पिंपरी टाऊन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने चालक, वाहक विश्रांती कक्षाचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी दिवाकर रावते उपस्थित होते. त्यावेळी कक्षाची पाहणी त्यांनी केली. आसनव्यवस्था, बेड, स्वच्छतागृहात जाऊन त्यांनी पाहणी केली. सूचनाही केल्या या कक्षातील भिंतीवर विविध सुविचार लिहिलेले आहेत.
त्यापैकी ‘व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार’ या सुविचाराजवळ रावते उभे राहिले. हा सुविचार वाचला. व्यवसनांचा करू धिक्कार आणि विकास योजनांना कसा काय हातभार लावणार? त्यावर उपस्थिांपैकी एक जण म्हणाले, ‘चालक वाहकांना चांगले वाटावे म्हणून सुविचार लिहले आहेत. त्यावर चुकीच्या सुविचारातून चुकीचा संस्कार होत असतो. व्यसनांचा धिक्कार करून कसा काय विकास साधणार. मला वाटते सुविचार लिहणारा हा मोदी समर्थक असावा.’’ या रावते यांच्या वाक्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हास्य उमटले. त्याचवेळी संतोष मानेचे उदाहरण देत रावते म्हणाले, ‘‘चुकीमुळे अर्थही चुकीचा निघतो. त्यामुळे सुविचार हे सुविचारच हवेत. काहीतरी चुकल्यामुळे संतोष मानेची फाशी रद्द करावी लागली.’’ त्यानंतर रावते यांनी कक्षाची पाहणी करून चालक वाहकांना झोपण्यासाठी जागा देऊन चालणार नाही, त्यांना आरामाची झोप येण्यासाठी गाद्या, वातानुकुलीत यंत्रणा आणि तर त्यांचे मन प्रसन्न राहिल यादृष्टीनेही मनोरंजनासाठी उपाययोजना करायला हव्यात याविषयी सूचना केल्या.