काय सांगता! पुण्यात पेट्रोल सगळ्यात महाग; नागरिकांच्या खिशाला इंधन दरवाढ लावणार कात्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 12:10 PM2021-02-06T12:10:21+5:302021-02-06T12:33:11+5:30
जनता माफ नही करेगी म्हणणाऱ्या भाजपच्या काळात भडकले इंधन
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अवस्था अगदी कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. पुण्यात तर पेट्रोलने चक्क सात वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. एकेकाळी विरोधकांना सत्तेतून खेचण्यासाठी 'जनता माफ नही करेगी' असा नारा देत इंधन महागाईवर बोलणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) काळातच इंधनदर भडकल्यामुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर काही आठवड्यातच केंद्र सरकारने अबकारी करात वाढ केली. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत केंद्र सरकारने तीनदा अबकारी कर वाढविला. महाराष्ट्र सराकरनेही इंधनावर प्रतिलिटर २ रुपये कर वाढविला. नोव्हेंबर २०२० नंतर सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेल पाठोपाठ स्वयंपाक गॅसच्या दरातही केंद्र सरकारने वाढ केली आहे. पेट्रोलच्या भावाने सात वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत ९३.१४ रुपये प्रतिलिटरवर झेप घेतली असून, डिझेलने ८२.३८ रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे भाव दीडशे डॉलरच्या घरात गेले होते. त्यावेळी पेट्रोलचे प्रतिलिटर भाव ९३ रुपये झाले होते. आता क्रूड ऑईलचे दर त्या वेळच्या तुलनेत निम्म्याने असूनही इंधनाचे भाव नवा उच्चांक गाठताना दिसत आहेत. शहरात पेट्रोलच्या भावाने ९३.१४ रुपये प्रतिलिटर उसळी घेत उच्चांक प्रस्थापित केला आहे. या पूर्वी डिझेलच्या भावाचा उच्चांक ७८ रुपये प्रतिलिटर होता. जानेवारी २०२१च्या सुरुवातीला हा उच्चांक मोडला गेला. त्यानंतर १४ जानेवारीला डिझेलने ८०.०६ रुपयांचा टप्पा ओलांडला. आता डिझलेच्या भावाने ८३ रुपये प्रतिलिटरकडे वाटचाल सुरु आहे. ह्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका सर्वांच्याच खिशाला कात्री लावणार हें नक्की आहे. पुढील दिवसात पेट्रोलचे दर शंभरी पार करणार असल्याची देखील चर्चा आहे.