पुणे विद्यापीठात शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करा: भाजप शहराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 08:37 PM2018-06-27T20:37:34+5:302018-06-27T20:38:06+5:30
शिवाजी महाराजांच्या सविस्तर इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश असावा अशी मागणी भाजप शहराध्यक्षांनी केली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुण वैशिष्ट्यांवर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा आणि या विषयात संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन केली.
शिवाजी महाराजांचे बालपण, विजापूर घराण्याशी संघर्ष, अफजलखानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, पावनखिंडीतील लढाई, मुघलांबरोबरील संघर्ष, शाहिस्तेखानावरील हल्ला, राज्याभिषेक आदी प्रसंगांचा सविस्तर इतिहास अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात असावा आणि दुस-या भागात शिवाजी महाराजांची न्याय पध्दत, अष्टप्रधान मंडळ, जमीन महसूल, चलन, व्यापार, कर पध्दती, सामाजिक व्यवस्थापन, प्रशासन, संस्कृत आणि मराठीचा प्रसार, धार्मिक धोरण, लष्कर, किल्ले, नौदल, शिवाजी महाराजांनंतरचे मराठा साम्राज्य आदी विषयांचा समावेश असावा असे श्री. गोगावले यांनी म्हटले आहे.
विद्यापीठात हा अभ्यासक्रम शिकवित असतानाच तो दूरशिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकता यावा अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी. आर्थिक मागस विद्यार्थ्यांना फेलोशिप व शिष्यवृत्ती द्यावी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विशेष उत्तेजन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.