पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर विद्यार्थ्याचे छायाचित्र छापले जाणार असून, रविवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचा वापर करून नोकरी मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या घटनांना आळा बसणार आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे सहा लाख आहे. सध्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र (कॉन्व्हेक्शन सर्टिफिकेट) छापण्याची स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ सर्व प्रमाणपत्र देणे विद्यापीठाला शक्य झाले आहे. गुणपत्रिका छापण्यासाठी लागणारे अत्याधुनिक प्रिंटर्स परीक्षा विभागात सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे गुणपत्रिका छापण्यासाठी होणारा विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी झाला आहे.
विद्यापीठाच्या रविवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत अधिसभा सदस्य विक्रम बोके यांनी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो छापून यावा त्यामुळे गुणपत्रिकेचा गैरवापर होणार नाही, असा प्रस्ताव मांडला. त्यास अधिसभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, सध्या विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या प्रिंटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे छायाचित्र गुणपत्रिकेवर छापता येणार नाहीत. त्यामुळे त्यावर लवकरच निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. परिणामी विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरील होणारा खर्च कमी झाला. त्यामुळे परीक्षा शुल्कातील काही रक्कम विद्यार्थ्यांना परत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर विद्यापीठातर्फे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच याबाबत न्यायालयातही याचिका दाखल असून, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना शुल्काची रक्कम द्यावी लागणार आहे.
--
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या एमसीक्यू परीक्षांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुकर झाले आहे. त्यामुळे यापुढील काळातील पारंपरिक पद्धतीबरोबरच ‘ओपन बुक एक्साम’ , ‘ऑनलाइन डिस्क्रिप्टिव्ह एक्साम’ यांसारख्या अन्य पद्धतीचा समावेश विद्यापीठाने करावा, याबाबत अधिसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
---------------------------
फोटो - पुणे विद्यापीठ