पिंपरी : धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झाल्याने आठवड्यातून एकदा ऐवजी आता दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले असून, पुढील आठवड्यात पाणीकपात वाढविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील बंधाºयातून जलउपसा केंद्राच्या माध्यमातून पाणी उचलले जाते. त्यानंतर जलउपसा केंद्रातून जलशुद्धीकरण केंद्रात तेथून जलवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पाण्याची पातळी दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून, ५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसाला ४८० एमएलडीऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या होत्या.
दिवसाआड पाणी
धरणात आजमितीला ३४.०० टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी हा साठा ४४.८० टक्के होता. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी १० टक्के पाणीसाठा कमी झाला असून, तो ५ जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. एक मार्चपासून आठवड्यातून एकदा पाणीकपात हे नियोजनही फसले होते. त्यातच यंदा पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्णतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार १० टक्के पाणीकपात लागू करावी, या सूचनेचीही अंमलबजावणी उशिराने केली गेली. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आणखी सात-आठ टक्के पाणीकपात वाढवावी लागणार आहे. आता १० टक्क्यांऐवजी १८ टक्के पाणीकपातीची नामुष्की ओढवणार आहे.
महापौर राहूल जाधव म्हणाले, ‘‘पवना धरणातील गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्यांनी पाणी साठा कमी आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. सध्याचा पाणीसाठा हा जूनअखेरीपर्यंत पुरेसा आहे. पावसाळा लांबल्यास गैरसोय होऊ नये, पाण्याचे संकट ओढावू नये, यासाठी पाणीकपात करावी लागणार आहे. दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे.’’
विरोधीपक्षनेते दत्त्ता साने म्हणाले, ‘‘पाणी कपात करण्यापेक्षा पाणी गळती आणि पाणी चोरी यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. पाण्याचे वितरण आजही योग्य पद्धतीने होत नाही. प्रशासनाने पाणी पश्नी गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षीत आहे. अद्याप पाणी कपातीविषयी विरोधीपक्षाच्या सदस्यांना कोणतीही माहिती नाही. जनतेवर परिणाम करणारे निर्णय घेताना गटनेत्यांचा विचार घेणे गरजेचे आहे.’’
शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले, ‘‘पाणी कपातीविषयी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गटनेत्यांशी चर्चा केलेली नाही. ती करणे अपेक्षीत आहे. कपातीला विरोध नाही. पाणी नियोजन करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. पाणी गळती, पाणी चोरी रोखून चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला चालना देणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य आणि समान वाटप करणे गरजेचे आहे.’