पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. परदेशातून आलेल्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यत १०३ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. तर ८७ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. परदेशातून आलेल्यांमुळे पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भर पडत आहे. ओमायक्रॉनवर उपचार करण्यासाठी भोसरी आणि पिंपरीत दोन रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. आजपर्यंत परदेशातून आलेल्या ६५ तर त्यांच्या संपर्कातील ४३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यापैकी परदेशातून आलेल्या ३५ जणांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, त्यांच्या संपर्कातील १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच रँडम तपासणीत ४४ जणांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.
सर्वांची प्रकृती स्थिर
आज आढळलेले तिघे जण परदेशातून आलेले आहेत. त्यात तिघेही पुरूष आहेत. एक जण बांगलादेशातून, एक जण सौदी अरेबियातून, एक जण रँडम तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील तीन जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वांवर भोसरीतील महापालिका आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.