पिंपरी महापालिका स्वीकृत सदस्यपदी २४ जणांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:50 PM2018-04-26T21:50:30+5:302018-04-26T21:50:30+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती सदस्यपदी २४ जणांची निवड झाली आहे. ही निवड दोन वर्षांसाठी असणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती सदस्यपदी २४ जणांची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाने प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यपदावर २४ पैकी दोनच जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपात असंतोष पसरला आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. ही निवड दोन वर्षांसाठी असेल, अशी माहिती भाजपाचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग समिती स्वीकृत सदस्य निवड करण्यात आली. अ प्रभागावर राजेश पोपट सावंत, सुनिल मानसिंग कदम, राजेंद्र नामदेव कांबळे यांची निवड जाहिर झाली आहे. तसेच ब प्रभागावर बिभीषण बाबु चौधरी, विठ्ठल बबन भोईर, देविदास जिभाऊ पाटील यांची निवड, तर क प्रभागावर वैशाली प्रशांत खाडे, गोपीकृष्ण भास्कर धावडे, सागर सुखदेव हिंगणे यांची तर, ड प्रभागावर चंद्रकांत बाबुराव भुमकर, संदिप भानुदास नखाते, महेश दत्तात्रय जगताप यांची तर ई प्रभागावर अजित प्रताप बुर्डे, साधना सचिन तापकीर, विजय नामदेव लांडे यांची तर फ प्रभागावर दिनेश लालचंद यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर यांची तर ग प्रभागावर संदिप काशिनाथ गाडे, गोपाळ काशिनाथ माळेकर, विनोद हनुमंतराव तापकिर यांची तर ह प्रभागावर अनिकेत राजेंद्र काटे, कुणाल दशरथ लांडगे, संजय गुलाब कणसे यांची निवड केली आहे.
स्विकृतवरून भाजपात गटबाजी, नाराजांचे आंदोलन
महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जु आणि नवीन पदाधिकाऱ्यांत वाद सुरू झाला आहे. प्रभाग समिती स्विकृत सदस्य निवडीच्या निमित्ताने गटबाजी उफाळून आली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरूवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेत सत्ता आल्यानंतर स्विकृत सदस्य, स्विकृत नगरसेवक पदावर कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षात बाहेरून आलेल्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने आयाराम गयाराम यांना संधी देण्याचे काम सुरू आहे. महापौर, स्थायी समिती सभापती, विविध समिती सभापती, स्विकृत सदस्य आणि नगरसेवक पदावर जुण्यांना डावलले जात आहे. त्यामुळे शहर भाजपमधील निष्ठावान आणि आयाराम यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडीत डावलल्याचा आरोप करत होणा-या अन्यायाविरोधात जुन्या कार्यकर्त्यांनी या पिंपरीत उपोषणाला सुरुवात केली आहे. गुरूवार सकाळपासून आंदोलन सुरू आहे. जुने कार्यकर्ते सर्वच निराधार, शहरातील पार्टीला नाही कुणाचाच आधार असा मजकूर लिहिला आहे.