फरार आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे हस्तगत; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 08:13 PM2021-07-14T20:13:37+5:302021-07-14T20:14:06+5:30
आरोपीकडून एकूण ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त..
धायरी: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी देवलेश सूर्यकांत साळुंखे (वय २३ वर्षे, रा. संत रोहिदास नगर, ता. हवेली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने फरार तसेच रेकॉर्ड वरील आरोपींचा शोध घेत असताना हवेली पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या एका गुन्ह्यातील फरार आरोपी देवलेश साळुंके हा खडकवासला धरण चौक परिसरात आला असून त्याच्या कमरेला पिस्टलसारखे हत्यार खोचले असल्याचे दिसत आहे. अशी गोपनीय बातमीदारमार्फत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी याबाबत त्याठिकाणी गेले असता एकजण संशयितरित्या फिरत असल्याने त्याची चौकशी करून झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. या आरोपीकडून एकूण ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी साळुंखे यास अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस नाईक विजय कांचन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे,मंगेश भगत,धीरज जाधव, पूनम गुंड, दगडू विरकर या पथकाने केली.