दुर्मिळ ‘शिवसुमन’ वनस्पतीचे गडकोटांवर रोपण- शिवराज्याभिषेक दिनप्रीत्यर्थ उपक्रम; संवर्धन करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:23+5:302021-06-09T04:12:23+5:30
बायोस्फिअर्स, माबि, संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्था, पुणे, देवराई संस्था, आम्ही भोरकर संस्था, सामाजिक वनीकरण, पुणे, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई ...
बायोस्फिअर्स, माबि, संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्था, पुणे, देवराई संस्था, आम्ही भोरकर संस्था, सामाजिक वनीकरण, पुणे, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान, श्रीकृष्ण ट्रेडिंग, रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, रायरी, सत्यवीर मित्र मंडळ आणि सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
शिवसुमन (फ्रेरिया इंडिका) या दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ वनस्पतीचे रोपण जलमंदिर पॅलेस, सातारा या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते झाले. शिवसुमन या वनस्पतीबाबत शास्त्रीय माहिती देणारे पत्रक छत्रपती उदयनराजे महाराज यांना डॉ. सचिन पुणेकर यांनी सुपूर्त केले. तसेच देशी स्थानिक बियांचा वापर करून साकारलेल्या शिवबीज चित्रातील बियांचे उपस्थित शिवप्रेमींना रोपणासाठी हस्तांतरण केले. भोर परिसरातील शेतकरी आणि निसर्गप्रेमी यांना स्थानिक-देशी वनस्पतींचे बीज या निमित्ताने देण्यात आले. आजपासून या हरित शिवबीज अभियानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
जगाच्या पाठीवर केवळ सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये आढळून येणाऱ्या 'फ्रेरिया इंडिका' या वनस्पतीचे दोन वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावरील शिवसदरेवर 'शिवसुमन' असे नामकरण केले आहे. फ्रेरिया इंडिका या वनस्पतीला येणाऱ्या फुलांचा रंग भगवा-लालसर असतो. त्यांचा आकार सुदर्शनचक्राप्रमाणे असतो. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी आणि या वनस्पतीचा प्रथम शोधही शिवनेरीवरच लागला हे विशेष. तसेच या वनस्पतीचा प्रादेशिक आढळही सह्याद्री पर्वतरांगांतील गडकिल्ल्यांवरच आहे. ही वनस्पती अतिसंकटग्रस्त असून, जगभरात केवळ महाराष्ट्रातच आढळते.
‘शिवसुमन’चे रायरेश्वर, रोहिडेश्वर, तोरणा, राजगड या गडकिल्ले परिसरात रोपण करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी डॉ. सचिन पुणेकर, सचिन देशमुख, पराग शिळीमकर, सुनील जंगम, समीर घोडेकर, नीलेश खरमाळे, शांताराम खोपडे, गणेश मानकर, संजय गोळे, कालिदास धाडवे, अमित गाडे उपस्थित होते.