पुणे - संत वाङ्मयात अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या तरटी म्हणजेच वाघाटी या वनस्पतीचे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात रोपण करण्यात आले. संत कान्होपात्रा यांची समाधी याच ठिकाणी आहे. पूर्वीचा तरटीचा वृक्ष वठल्यामुळे त्याच ठिकाणी त्या वृक्षाचे रोप लावण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा संत कान्होपात्रा यांच्या समाधीत वाघाटीला बहर येणार आहे. पुण्यातील वनस्पती संशोधक डॉ. सचिन पुणेकर यांनी हे रोप उपलब्ध करून पंढरपूरला पाठविले आहे.
विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळीत संत कान्होपात्रेने यांनी समाथी घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात याच तरटी झाडाच्या रूपात कान्होपात्रेला पाहिले जाते. कालांतराने हे झाड वाळून गेले. तिथे या झाडाचे वाळलेले ओंडके होते. त्याचेच दर्शन वारकरी घेत असत. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही, अशी वारकऱ्यांची धारणा आहे. भाविकांच्या श्रद्धेचा व त्यांच्याविषयी असलेल्या भावनांचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने येथे पुन्हा तरटीचे रोपण करण्याचा निर्णय घेतला.
वनस्पती संशोधक डॉ. पुणेकर म्हणाले,‘‘मंदिरातील तरटीचे झाड वठलेले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी हेच झाड लावावे यासाठी मी विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना पत्र पाठवून विनंती केली होती. त्यानंतर समितीने ते मान्य करून आज मुख्यमंत्री, वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत तरटीच्या झाडाचे रोपण करण्यात आले.’’
—————————————
दिवे घाटातून मूळ शोधून बनवले रोप
मंदिर समितीने परवानगी दिल्यानंतर डॉ. पुणेकर यांनी दिवे घाटातील डोंगरावर फिरून वाघाटी शोधले. त्याचे तयार करून ते पंढरपुरला पाठविले.
——————————————-
तरटीविषयी थोडंसं...
तरटीचा वेल हा बहुवर्षीय असून, खोड गोलाकार होते. फांद्या इतरत्र पसरतात. काटे वाघाच्या नखासारखी असल्याने या वेेलीला वाघेटी असेही म्हणतात. फुले पांढरी किंवा फिकट गुलाबी असतात. फळ गोल, हिरवट-तांबूस असते. बिया आणि गरयुक्त फळ पिकल्यावर लाल होऊन तडकते. वाघाटी उष्ण, उत्तेजक व पित्तनाशक आहे. उष्णतेमुळे अंगावर वळ उठल्यावर मूळ उगाळून लेप लावतात. क्षयरोगावर ही अत्यंत गुणकारी औषध आहे. फळ कफ, वायू यांचा नाश करते. फळ उगाळून पाण्यातून पोटदुखीवर इलाज म्हणून पिण्यासाठी देतात.