प्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 08:15 PM2018-06-25T20:15:26+5:302018-06-25T20:26:33+5:30
नामांकित कंपन्यांकडून पॅकिंग केलेल्या वेफर्स आणि इतर पदार्थांची प्लास्टिक पिशव्यात विक्री केली तर कोणतीही कारवाई होत नाही.परंतु....
पुणे: प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून केली जाणारी कारवाई चूकीची असल्याचा आरोप पुण्यातील व्यापा-यांनी केला. तसेच कोणत्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करावी किंवा करू नये याबाबत स्पष्टता नसल्याने सोमवारी व्यापा-यांनी पालिकेसमोर आंदोलन केले. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे बापट यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदीच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली.शहरातील विविध ठिकाणच्या व्यापा-यांवर कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला. शहरातील काही खाद्य पदार्थ उद्योजकांनी तयार केलेले पदार्थ स्वत:च्या ब्रॅण्डच्या नावाचा उल्लेख असलेल्या पिशवीत विक्रीसाठी ठेवले तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.परंतु,नामांकित कंपन्यांकडून पॅकिंग केलेल्या वेफर्स आणि इतर पदार्थांची प्लास्टिक पिशव्यात विक्री केली तर कोणतीही कारवाई होत नाही. तसेच मुंबई व पुण्यात वेगवेगळ्या पध्दतीने कारवाई केली जात आहे.त्यामुळे कोणत्या प्लास्टिकवर कारवाई केली जाईल; यासंदर्भातील नियमावली जाहीर करावी, अशी मागणी पुण्यातील व्यापा-यांनी केली. ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक यांच्या शिष्टमंडळाने बापट यांनी भेट घेवून अडचणी मांडल्या. बापट म्हणाले, प्लास्टिक बंदीबाबत न्यायालयाने आदेश दिले असून राज्य शासनाने त्यानुसार नियमावली तयार करून कारवाई सुरू केली आहे. प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा -हास विचारात घेवूनच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाकडून सुमारे नऊ महिन्यांचा अवधी दिला होता.सुरूवातीच्या काळात काही अडचणी येऊ शकतात.कोणालाजी त्रास देण्याची शसानाची भूमिका नाही. त्यामुळे येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान,प्लास्टिक बंदीमुळे घरगुती पदार्थ तयार करून उपजिविका करणारे लहान उद्योजक,महिला बचत गट,मिठाई,चिवडा यांची विक्री करणारे व्यापारी अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे शासनाने याबाबत लक्ष घालावे,अशी मागणी व्यापा-यांनी बापट यांच्याकडे केली.
---------------------
सर्व व्यापा-यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले असून पहिल्या दिवसापासून प्लास्टिक कॅरीबॅग बंद केल्या आहेत. मात्र, कपडे किंवा काही दिवसांनंतर खराब होणारे अन्न पदार्थ प्लास्टिक पिशवीतून इतर राज्यातून महाराष्ट्रात दाखल होतो. परंतु, पालिकेकडून अशा पिशव्यांवरही कारवाई केली जात आहे.त्यामुळे नाईलाजास्तव व्यापा-यांना संप करावा लागला आहे.शासनाने कारवाई संदर्भातील नियमांबाबत जागृती करावी,अशी अपेक्षा व्यापा-यांनी व्यक्त केली.त्यावर पालिका प्रशासनाला जागृती करण्याच्या सुचना दिल्या जातील,असे बापट यांनी स्पष्ट केले.