बारामती : कासार समाजाच्या वतीने भटक्या विमुक्त जातींच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. २८) तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. याबाबत जागतिक कासार समाज फाउंडेशनने पुढाकार घेतला. राज्यभर विखुरल्या गेलेल्या या समाजाच्या हालाखीच्या अवस्थेकडे राज्यकर्त्यांचे कधी लक्ष गेले नाही. पोटापाण्यासाठी सतत भटकंती करावा लागत असलेला हा समाज गेल्या तीन तपांपेक्षाही अधिक काळापासून भटक्या जाती ब वर्गामध्ये समावेश व्हावा म्हणून शासन दरबारी झगडत आहे.
कासार समाजाप्रमाणेच धातू वितळवून देवाच्या मूर्ती, घंट्या, भांडी बनवून गावोगावी विकणारा ओतारी समाज शासनाने सन १९७७ च्या सुमारास ‘भटक्या जाती ब’ या प्रवर्गात समाविष्ट केला. मात्र, कासार समाज आजही ओबीसी प्रवर्गात आहे. समाजाच्या भांडी व बांगड्या बनविणे व विकणे या परंपरागत व्यवसायात अनेक दुसऱ्या समाजातील भांडवलदार वर्गाने बस्तान बसविले आहे. परिणामी शासकीय नोकरीतही नाही, व्यवसायात पीछेहाट अशा दयनीय अवस्थेतून समाज बांधव जात आहेत, म्हणून जागतिक कासार समाज फाउंडेशनने राज्यभरातील कासार समाज बांधवांना भटक्या विमुक्त प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. याबाबत तहसीलदार हनुमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सुरेश वनकु द्रे, मंगेश क ोळपकर, भाऊसाहेब गाडेकर आदींची भाषणे झाली. या वेळी महावीर कुंभारकर, भाऊसाहेब गाडेकर, बागवडे, शाम पालकर, अमोल पालकर, राजू वजरीनकर, मनोज खुटाळे, सतीश खुटाळे, पाथरकर, किरण कोळपकर, बाळासाहेब रासने, बाळासाहेब कोकिळ, शाम तिवाटणे, संदीप कासार आदी समाजबांधवांनी मोर्चामध्ये भाग घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.