पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमावर पुण्यातील विद्यार्थी खूश झालेले दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशभरात 24 राज्यातील विद्यार्थ्यांशी परीक्षा विषयावर संवाद साधला. दृकश्राव्य माध्यमातून झालेला हा संवाद पुण्यातील मुलांचे पेरुगेट हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनीही ऐकला. यावेळी प्रत्येक शाळेत प्रोजेक्टर स्क्रीनवरून विद्यार्थ्यांना हा संवाद ऐकवण्यात आला. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या.
11 वीमध्ये शिकणारा दिग्विजय एडके म्हणाला की, मोदी यांचे भाषण ऐकून आज आमच्या हडकुळ्या अंगावर मूठभर मास चढले. त्यांनी साधलेल्या संवादात आम्हाला प्रचंड हुरूप आला. प्रथमेश लाड म्हणाला की, मोदी यांनी बोलताना तंत्रज्ञानाचा मुद्दाही उचलला. सध्या अनेकांना असलेल्या पब जी गेमच्या अतिवापरावर त्यांनी भाष्य केले.
विशाल थोपटे म्हणाले की, मोदी यांनी 10 वी आणि 12 वी हाच फक्त टर्निंग पॉईंट नाही. ते महत्वाचे टप्पे असले तरी अंतिम ध्येय नसल्याचे त्यांनी सांगितले. 12वीत असलेला कौस्तुभ सुरे म्हणाला की, माझी लवकरच बोर्डाची परीक्षा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेले अनेक मुद्दे महत्वाचे असून विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या जबाबदारीची जाणीवही त्यांनी करून दिली.