PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्वत: तिकीट काढत मेट्रोतून प्रवास केला. यावेळी प्रवासात मोदींनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोदींनी शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांना विविध प्रश्न विचारले. यात मोदींनी या शालेय विद्यार्थ्यांना नेमकं काय विचारलं याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची भेट घेऊन तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे? तुमची काय इच्छा आहे? तुम्ही कोणत्या शाळेत शिकता आणि आमची नावं विचारली", असं मोदींशी संवाद साधलेल्या विद्यार्थिनीनं म्हटलं.
मोदींनी मेट्रो प्रवासात ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांची प्रतिक्रिया 'लोकमत'नं जाणून घेतली. यात विद्यार्थ्यांनी देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी आमचं नाव, शाळेचं नाव आणि तुमचं स्वप्न काय आहे असं विचारल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितली. मोदींनी एका विद्यार्थ्याला मेट्रोतून प्रवास करताना कसं वाटतंय? असंही विचारलं. त्यावर विद्यार्थ्यांनीही पंतप्रधानांशी भरभरून संवाद साधल्याचं सांगितलं.