पुणे : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आठही विधानसभा मतदारसंघांत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, महेश पुंडे, गणेश कळमकर, सुशील मेंगडे यांच्यासह माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य तसेच प्रत्येक प्रभागात कमीतकमी १० हजार सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आला असून, या अभियानाचे प्रमुख म्हणून पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर यांची निवड केली आहे.याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत, शाश्वत विकासाला प्राधान्य देत जनतेने भारतीय जनता पार्टीला प्रेम दाखविले आहे. सामान्य नागरिक भाजपशी जोडू इच्छित आहे, त्यामुळे पक्षाने राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करील, असा विश्वास आहे.
PMC Election : महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
By राजू हिंगे | Published: December 10, 2024 6:43 PM