PMC: शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना फक्त महापालिका हद्दीपुरतीच
By निलेश राऊत | Published: June 16, 2023 05:27 PM2023-06-16T17:27:00+5:302023-06-16T17:27:21+5:30
महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे महापालिका हद्दीबाहेरील नागरिकही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असतात...
पुणे :पुणे महापालिकेच्यावतीने शहरातील गरीब नागरिकांना वैद्यकीय उपचारात आर्थिक मदत करण्यासाठी राबविण्यात येणारी, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना केवळ पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या व ज्यांचे उत्पन्न १ लाख रूपयांच्या आत आहे त्यांच्यासाठीच लागू आहे.
महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे महापालिका हद्दीबाहेरील नागरिकही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असतात. तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या पुढे आहे व ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे असे नागरिकही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असल्याचे निदर्शनास आले आहेत. परंतु ही योजना शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील पिवळे रेशनकार्डधारक, गलिच्छ वस्ती निमुर्लन सेवाशुल्क धारक व केशरी रेशनकार्डधारक यांच्यासाठी आहे.
ही योजना ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा गरीब कुटुंबियासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत लागू करण्यात येत आहे. तथापि ही सवलत फक्त जे नागरीक आरोग्य विमा योजनेचे सभासद होतील त्यांच्यापुरतीच लागू राहील. तसेच ही योजना फक्त जनरल वॉर्डसाठी लागू असून, सेमी प्रायव्हेट प्रायव्हेट व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णाला या योजनेचा फायदा मिळणार नाही.
शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पिटल मधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने ५०% किंवा १०० % हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख (किडनी, हथरोग व कॅन्सर) या कमाल मर्यादिपर्यंत खर्च करण्यात येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च सबंधित रुग्णाने भरणे आवश्यक आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा नाईक यांनी दिली.
योजनेसाठी आवश्यक कागदपदत्रे
- झोपडपट्टीत राहत असल्याचे ग.व.नि. विभागाचे चालू आर्थिक वर्षाचे सेवा शुल्क भरलेली पावती किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेले पिवळे रेशनकार्ड व वार्षिक उत्पन्न एक लाखपर्यंत असलेला तहसीलदार, पुणे यांचा दाखला.
- पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- आपत्यांचे आधार कार्ड ( वय वर्ष २५ खालील )
- कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधारकार्ड (पुणे मनपा कार्यक्षेत्रातील)
- कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
- सदर योजनेची नोंदणी फी रु. १००/- वार्षिक शुल्क रु.१००/- अशी एकूण रक्कम र.रु. २००/-
दरम्यान रूग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सदर योजनेचे कार्ड काढून रुग्णालयात दाखल झाल्यापासूनचे लाभ मिळण्याची मागणी करीत आहेत. परंतु, शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार सदर योजनेचे सभासद कार्ड ॲडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे.