पीएमपीला ‘पंक्चर’चे ग्रहण
By admin | Published: October 6, 2015 04:56 AM2015-10-06T04:56:53+5:302015-10-06T04:56:53+5:30
बसमधील तांत्रिक समस्या आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खोलीचा अंदाज न आल्याने वाहने आदळण्यामुळे पीएमपीच्या बसला पावसाळ्यात
पुणे : बसमधील तांत्रिक समस्या आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खोलीचा अंदाज न आल्याने वाहने आदळण्यामुळे पीएमपीच्या बसला पावसाळ्यात पंक्चरचे ग्रहण लागले आहे. गेल्या चार महिन्यांत बस पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले असून, दरदिवशी सरासरी ३० गाड्या मार्गावर पंक्चर झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. याशिवाय, हे पंक्चर काढणेही पीएमपीसाठी तोट्याचे ठरत असून, प्रतिपंक्चर सरासरी ५०० ते १ हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. हा खर्च पावसाळ्यात दरमहा ९ ते १० लाखांपर्यंत पोहोचला आहे. तर, गेल्या ९ महिन्यांत हा आकडा ५ हजार ९३ वर पोहोचला असून, त्यासाठी पीएमपीला तब्बल ५० लाखांहून अधिक खर्च करावा लागला आहे. या शिवाय संबंधित बसची फेरी रद्द झाल्याने कोट्यवधीच्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागले आहे.
शहरात पीएमपीच्या दररोज सरासरी १४०० बस संचलनात असतात, अनेकदा वाहनांचे टायर खराब असल्याने अथवा रस्त्यांवर इतर काही समस्या आल्यास बस पंक्चर होतात. मात्र, हे प्रमाण दरमहा सरासरी ५०० च्या असापास असते. मात्र, या वर्षी पावसाळ्यात हे प्रमाण वाढले असून, हा आकडा दरमहा सरासरी ८०० च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा होत असून, अनेक मार्गावर अचानक बस बंद पडल्यास काही फेऱ्या प्रशासनास रद्द कराव्या लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतच आहे. शिवाय या पंक्चरसाठी मोठ्या प्रमाणावर खर्चाचा भारही पीएमपीला सहन करावा लागत आहे.
महिनापंक्चरची संख्या
जानेवारी ५७४
फेब्रुवारी५०६
मार्च६८०
एप्रिल६७२
मे५७२
जून६५०
जुलै६७५
आॅगस्ट७२५
सप्टेंबर८७४
एकूण५०९३
पंक्चर वाहनांमध्ये सीएनजी बसचे प्रमाण सर्वाधिक आहे. या वाहनांच्या चाकांमध्ये असलेल्या ब्रेकच्या सिस्टिममधील सदोष तांत्रिक यंत्रणेमुळे या बसच्या टायर पंक्चरचे प्रमाण अधिक असल्याने पीएमपीमधील अभियंत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यामुळे यापुढे या गाड्यांच्या यंत्रणेबाबत तसेच इतर वाहनांसाठी रेडियल टायर वापरण्याबाबत प्रशासनाचा विचार सुरू असून, पंक्चरचे प्रमाण कमी करून पीएमपीचे आर्थिक नुकसान थांबविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.