PMPML: मेट्रोच्या कामामुळे पीएमपीच्या मार्गात बदल; १२ ते १५ ऑगस्टदरम्यान 'हा' रस्ता बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:32 PM2023-08-10T20:32:42+5:302023-08-10T20:34:06+5:30
नागरिकांनी हा बदल स्वीकारून त्यानुसार बसने प्रवास करावा, असे आवाहन पीएमपीच्यावतीने करण्यात आले आहे....
पुणे : शिवाजीनगर - हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम करण्यासाठी बाणेर रस्ता सोमेश्वर वाडी फाटा ते महाबळेश्वर हॉटेल यादरम्यान दि. १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवला जाणार आहे. त्याचा परिणाम या भागातील वाहतुकीवर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पीएमपीतर्फे या मार्गावरील बसच्या मार्गात बदल करत पर्यायी मार्ग सुचविले आहेत. तरी नागरिकांनी हा बदल स्वीकारून त्यानुसार बसने प्रवास करावा, असे आवाहन पीएमपीच्यावतीने करण्यात आले आहे.
मेट्रो प्रकल्पाचे शिवाजीनगर ते हिंजवडी माण फेज ३ या मार्गावरील काम सुरू असल्यामुळे सोमेश्वरवाडी फाटा ते महाबळेश्वर हॉटेल बाणेरपर्यंत मेट्रोच्या कामाकरिता (दि. १२ ते १५) या चार दिवसांच्या कालावधीमध्ये बाणेर रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
परिणामी, बाणेर रस्त्यावरून संचलनात असलेले बस मार्ग क्रमांक ११४, २०८, २५६, २५८ व ३६० या बस मार्गांच्या वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. या मार्गांवरील बसेस बाणेरकडे जाताना बाणेरफाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय, परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रोडने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉइंट हॉस्पिटलपासून डावीकडे वळण घेऊन लिंकरोडने सरळ पुढे ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यापासून पुढे पूर्ववत बस मार्गाने संचलन सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा (दि. १६) पासून सर्व बस मार्ग पूर्ववत संचलनात राहतील, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.