पीएमपीच्या ताफ्याला मिळणार नवी झळाळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:47 PM2019-04-26T12:47:21+5:302019-04-26T13:02:49+5:30

पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नवीन सीएनजी बसही येणार असल्याने ‘पीएमपी’ला नवी झळाळी मिळणार आहे.

PMP 's campaign will get a new light | पीएमपीच्या ताफ्याला मिळणार नवी झळाळी 

पीएमपीच्या ताफ्याला मिळणार नवी झळाळी 

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे २ हजार बस भाडेतत्वावरील सर्व व पीएमपीच्या मालकीच्या सुमारे ६०० बस सीएनजीवर धावतातमे महिन्याच्या मध्यापासून १२ मीटर लांबीच्या ई-बस ताफ्यात येण्यास सुरूवात होणार पुढील तीन महिन्यात १२५ बसतेजस्विनी बस, २५ इलेक्ट्रिक बस आणि पुढील चार-पाच महिन्यात एक हजार बस मिळणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यात लवकरच १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. पुढील महिन्याच्या मध्यापासून या बस ताफ्यात येण्यास सुरूवात होणार असून या बस बीआरटी मार्गातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नवीन सीएनजी बसही येणार असल्याने ‘पीएमपी’ला नवी झळाळी मिळणार आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात सध्या सुमारे २ हजार बस आहेत. त्यापैकी ६५३ बस भाडेतत्वावरील असून उर्वरीत बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. भाडेतत्वावरील सर्व व पीएमपीच्या मालकीच्या सुमारे ६०० बस सीएनजीवर धावतात. तर उर्वरीत बसपैकी २५ बस इलेक्ट्रिक व इतर बस डिझेलवरील आहेत. मालकीच्या काही बस १६ वर्ष वयोमान असलेल्या आहेत. निम्म्याहून अधिक  बस ८ ते १० वर्षाच्या पुढील आहेत. या बसची धाव निश्चित क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झालेले नाही. दररोज सरासरी १५० बस मार्गावरच बंद पडतात. तर देखभाल-दुरूस्तीअभावीही त्यापेक्षा जास्त बस आगाराच्या बाहेरच पडत नाहीत. त्यामुळे दररोज ४ ते ५ हजार फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे पीएमपीला नवीन बसची प्रतिक्षा आहे.
ही प्रतिक्षा पुढील महिन्यापासून संपणार आहे. मे महिन्याच्या मध्यापासून १२ मीटर लांबीच्या ई-बस ताफ्यात येण्यास सुरूवात होणार आहे. पुढील तीन महिन्यात १२५ बस मिळतील. त्याचप्रमाणे बारा मीटर लांबीच्या ४०० सीएनजी बसची खरेदी प्रक्रियाही अंतिम झाली आहे. या बस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून येतील. तसेच ४४० सीएनजी बसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांत या बस मिळतील. त्यामुळे पुढील ऑगस्ट ते सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत सुमारे एक हजार नवीन बस ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
------
डिझेल दर प्रति लिटर - ६८ रुपये
प्रति किलोमीटर खर्च - २२-२३ रुपये
सीएनजी दर प्रति किलो - ५५.३०
प्रति किलोमीटर खर्च - १९
ई-बस दर प्रति युनिट - ८ रुपये
प्रति किलोमीटर खर्च - ८ रुपये
............
नऊ मीटर लांबीच्या ईलेक्ट्रिक बसमध्ये चार बॅटरी आहेत. या सर्व बॅटरी चार्जिंग करण्यासाठी एकच पॉईंट असून सुमारे तीन तासात संपुर्ण चार्जिंग होते. यामध्ये ही बस २२५ किलोमीटर धावू शकते. पण सध्या १८० किलोमीटर धावल्यानंतर बॅटरी पुन्हा काही काळ चार्जिंग केली जाते. त्यासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चार्जिंग अभावी बस बंद पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या बॅटरीचे वयोमान साधारणपणे १० वर्ष असून सुमारे ४ हजार वेळा पुर्ण चार्जिंग होतात. या बसमुळे शुन्य टक्के प्रदुषण होते. नऊ मीटर लांबीच्या बसला केवळ डाव्या बाजूलाच दरवाजा आहे. तर बारा मीटर लांबीच्या बसला दोन्ही बाजूला दरवाजे आहेत. त्यामुळे या बसची आसन संख्या जवळपास सारखीच आहे. 
-----------
मागील काही वर्षात ‘पीएमपी’ला नवीन बस मिळाल्या नाहीत. मात्र, पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीपासून या बस येण्यास सुरूवात झाली आहे. मागील वर्षी २०० मिडी बस मिळाल्या. त्यानंतर तेजस्विनी बस, २५ इलेक्ट्रिक बस आणि पुढील चार-पाच महिन्यात एक हजार बस मिळणार आहेत. त्यामुळे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होणार असून प्रवाशांनाही चांगली सुविधा मिळणार आहे.

Web Title: PMP 's campaign will get a new light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.