कारच्या नंबर प्लेटवरुन पाेलिसांनी शाेधलं संगणक अभियंत्याला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:53 PM2018-12-18T23:53:18+5:302018-12-18T23:56:54+5:30
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास धडक देऊन पळून गेलेल्या संगणक अभियंत्याचा शोध घेऊन मुंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पुणे : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास धडक देऊन पळून गेलेल्या संगणक अभियंत्याचा शोध घेऊन मुंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
विशाल विजय पवार (वय ३५, रा़ड्रिम्स रागिनी सोसायटी, मांजरी मुळ, रिव्हर व्ह्यु, पालवा, डोंबिवली, मुंबई) असे या संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो मगरपट्टा येथील इन्फाेसिस कंपनीमध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत आहे.
अपघातग्रस्तांना मदत करा. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचा प्राण वाचवू शकतो, असे सर्व माध्यमातून सांगितले जाते. पण, संगणक अभियंता असलेल्या या तरुणावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याबाबत मुंढवा पोलिसांनी सांगितले की, गोविंद कुंडलिक जाधव (वय ६०, रा़ वडबन श्रीकृष्ण सोसायटी, मुंढवा) हे आपल्या कुत्र्यासह मॉर्निंग वॉकला जात होते. झगडे पार्कसमोरील रस्त्यावरील शर्ली शोरुमसमोर आले असताना कोरेगाव पार्क करुन मुंढवाकडे येणाऱ्या भरधाव कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यात ते जबर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. त्यांचा कुत्राही जखमी झाला.मात्र, हा संगणक अभियंता अपघातानंतर न थांबता पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक अमित वाळके यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेथे कारची नंबरप्लेट मिळून आली. त्यावरुन त्यांनी विशाल पवार याचा डोंबिवलीचा पत्ता शोधून काढला. मात्र, तो तेथे रहात नसल्याचे आढळून आले. त्याचा शोध घेऊन त्याला मांजरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानेच अपघात केल्याचे निष्पन्न झाल्याने पवार याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित वाळके, पोलीस नाईक निलेश गायकवाड, शिपाई शाम शिंदे, गणेश भापकर यांनी हा तपास केला.